दीक्षांत सभागृहाला काळमेघ यांचे नाव देता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:25 AM2017-12-23T00:25:54+5:302017-12-23T00:27:03+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील प्रवेशद्वारापुढील इमारतीमधील दीक्षांत सभागृहाला माजी कुलगुरू डब्ल्यू. एम. ऊर्फ दादासाहेब काळमेघ यांचे नाव देता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला जोरदार धक्का बसला आहे.

Kalmegh's name can not be given to the convocation hall | दीक्षांत सभागृहाला काळमेघ यांचे नाव देता येणार नाही

दीक्षांत सभागृहाला काळमेघ यांचे नाव देता येणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : नागपूर विद्यापीठाला जोरदार धक्का

आॅनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरातील प्रवेशद्वारापुढील इमारतीमधील दीक्षांत सभागृहाला माजी कुलगुरू डब्ल्यू. एम. ऊर्फ दादासाहेब काळमेघ यांचे नाव देता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला जोरदार धक्का बसला आहे. विद्यापीठाच्या मनसुब्याविरुद्ध नागपूर पारसी पंचायतने २००२ मध्ये रिट याचिका दाखल केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी ती याचिका मंजूर केली आहे.
नागपूर विद्यापीठ स्थापनेच्या वेळी टाटा कुटुंबाकडून १ लाख रुपयांची देणगी स्वीकारण्यात आली होती. ही देणगी देताना टाटा कुटुंबीयांनी प्रवेशद्वारापुढील इमारतीला जमशेदभाई एन. टाटा यांचे नाव देण्याची अट ठेवली होती. ही अट मान्य करण्यात आली होती. त्यानुसार, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने यासंदर्भात २६ जुलै १९२४ रोजी निर्णय पारित केला. इमारतीच्या उजव्या बाजूला ‘नागपूर विद्यापीठ जमशेदभाई नुसेरवानजी टाटा बिल्डिंग’ अशी मार्बल प्लेट लावण्यात आली आहे. दरम्यान, या इमारतीच्या तळमाळ्यावरील सर्वात मोठ्या दीक्षांत सभागृहाला दादासाहेब काळमेघ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
इमारतीला जमशेदभाई टाटा यांचे नाव असल्यामुळे इमारतीमधील सर्वात मोठ्या सभागृहाला काळमेघ यांचे नाव देता येणार नाही. तसे केल्यास टाटा कुटुंबीयांच्या इच्छेला बाधा पोहोचेल व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होईल. परिणामी, विद्यापीठाने त्यांच्याकडील अन्य इमारतीला काळमेघ यांचे नाव द्यावे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. विद्यापीठाने स्वत:ची बाजू स्पष्ट करताना याच इमारतीमधील अन्य छोट्या सभागृहाचे उदाहरण दिले होते. त्या सभागृहाला दिवंगत कुलगुरू जे. पी. गिमी यांचे नाव देण्यात आले आहे. त्या सभागृहात कार्यकारी परिषद व व्यवस्थापन परिषदेच्या बैठका होतात. परिणामी दीक्षांत सभागृहाला काळमेघ यांचे नाव दिल्यामुळे काहीच फरक पडणार नाही, असे विद्यापीठाने सांगितले.
याचिकाकर्त्याची बाजू योग्य
न्यायालयाने याचिकाकर्त्याची बाजू योग्य ठरवली. दीक्षांत सभागृहाचा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उपयोग केला जातो. तळमाळ्याचा मोठा भाग या सभागृहाने व्यापला आहे. त्यामुळे या सभागृहाला काळमेघ यांचे नाव देता येणार नाही. तसे केल्यास देणगीदात्याची इच्छा बाधित होईल. देणगी स्वीकारताना टाटा कुटुंबाची अट स्वीकारल्यामुळे आता मुख्य सभागृहाला दुसऱ्या व्यक्तीचे नाव देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे.

Web Title: Kalmegh's name can not be given to the convocation hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.