कळमेश्वर- ब्राह्मणी नगर परिषदेत भाजपा विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 10:42 PM2020-01-10T22:42:05+5:302020-01-10T22:44:19+5:30
कळमेश्वर- ब्राह्मणी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार (क) च्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुनील चुनारकर ८२५ मतांनी विजय झाले. त्यांनी काँग्रेसचे आशिष कुकडे यांचा पराभव केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कळमेश्वर) : कळमेश्वर- ब्राह्मणी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक चार (क) च्या पोटनिवडणुकीत भाजपचे सुनील चुनारकर ८२५ मतांनी विजय झाले. त्यांनी काँग्रेसचे आशिष कुकडे यांचा पराभव केला. चुनारकर यांना ३,३३६ तर कुकडे यांना २,५११ मते मिळाली. तिसरे उमेदवार मुकेश भरके (अपक्ष) यांना ४२ मते मिळाली.
कळमेश्व-ब्राह्मणी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले होते. यात ६१.०१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. शुक्रवारी नगर परिषद माध्यमिक विद्यालयमध्ये मतमोजणी झाली. या पोटनिवडणुकीमध्ये एकूण दहा बूथ होते.
कळमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेसने दमदार विजय मिळविला असताना कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, हे विशेष. भाजपच्या विजयानंतर जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राजेश जीवतोडे, मीना तायवाडे, धनराज देवके, ईमेश्वर यावलकर, संजय काकडे, महादेव ईखार यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्त यावेळी उपस्थित होते.