कामठी नागपूरचे उपनगर म्हणून विकसित होतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 20:18 IST2019-02-04T20:17:45+5:302019-02-04T20:18:51+5:30
कामठी शहराला नागपूरचे उपनगर म्हणून विकसित करीत असल्याने या परिसरात सक्षम वीज वितरणासह अन्य विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असून याचा लाभ येथील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे उद्गार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे काढले.

कामठी नागपूरचे उपनगर म्हणून विकसित होतेय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी ): कामठी शहराला नागपूरचे उपनगर म्हणून विकसित करीत असल्याने या परिसरात सक्षम वीज वितरणासह अन्य विकास कामे मोठ्या प्रमाणात होत असून याचा लाभ येथील जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे उद्गार ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे काढले.
महावितरणच्या वतीने कामठी शहरात उभारण्यात आलेल्या नवीन वीज वाहिनीचे लोकार्पण आणि भाजी मंडी-कोळसा टाल या नवीन वाहिनीच्या कामाचे तसेच ड्रॅगन पॅलेस येथील येथील वीज उपकेंद्रात नव्याने उभारण्यात आलेल्या १० एमव्हीए क्षमतेच्या रोहित्राचे लोकार्पण ना. बावनकुळे यांच्या हस्ते झाले. ड्रॅगन पॅलेस वीज उपकेंद्रात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे तर कामठी नगर परिषद अध्यक्ष मो. शहाजहाँ शफाअत अन्सारी, उपाध्यक्ष मतीन खान, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, कामठी तालुका विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष मोबीन पटेल विशेष उपस्थित होते.
ड्रॅगन पॅलेसमुळे कामठी शहराची जगात ओळख निर्माण झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथील वीज वितरणाचे जाळे मजबूत होत आहे. सोबतच पथदिवे आणि पाणी पुरवठ्यासाठी साधारण २ मेगा वॅट विजेची गरज भासणार आहे यासाठी नगरपालिकेने जागा दिल्यास हा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करता येईल यासाठी शासनाकडून १२ कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी यावेळी दाखवली.
कामठी परिसरात भूमिगत वीज वाहिनीची कामे करतेवेळी वॉर्ड पातळीवर कामाचे नियोजन करून ती पूर्ण करण्याची सूचना ना. बावनकुळे यांनी यावेळी महावितरण अधिकारी वर्गास केली. कामठी ड्रॅगन पॅलेस येथील वीज उपकेंद्रात २० एमव्हीए क्षमतेचे २ रोहित्र उभारण्यात आल्याने परिसरास दजेर्दार वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. अशी माहिती नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी संचालक दिलीप घुगल यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. यावेळी अधीक्षक अभियंता (पायाभूत आराखडा)उमेश शहारे, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे उपस्थित होते.