कामठी-घाेरपड-पारडी मार्ग खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:09 AM2021-03-31T04:09:48+5:302021-03-31T04:09:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : तालुक्यातील कामठी-घाेरपड-पवनगाव-पारडी हा मार्ग महत्त्वाचा असून, या मार्गाची वर्षभरातच दैनावस्था झाली आहे. या मार्गावरील ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तालुक्यातील कामठी-घाेरपड-पवनगाव-पारडी हा मार्ग महत्त्वाचा असून, या मार्गाची वर्षभरातच दैनावस्था झाली आहे. या मार्गावरील खड्ड्यांमुळे रहदारी व शेतमालाची वाहतूक करण्यास अडचणी येत असल्याने वाहनचालकांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
कामठी-घाेरपड-पवनगाव-पारडी हा मार्ग जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येताे. या मार्गावरील डांबरीकरण उखडल्याने तसेच त्यावर ठिकठिकाणी खड्डे तयार झाल्याने वर्षभरापूर्वीच या मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले हाेते. मात्र, वर्षभरातच हा मार्ग जैसे थे झाल्याने याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घाेरपड, पवनगाव, पारडी यासह अन्य गावांमधील शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना कामठी येथे येण्यासाठी या मार्गाला पर्यायी मार्ग नाही.
या गावांमधील शेतकरी व नागरिकांना शासकीय कार्यालये, बँका, दवाखाना, शेतमालाची विक्री, इतर साहित्याची खरेदी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कामठीला नियमित ये-जा करावी लागते. त्यासाठी त्यांना याच मार्गाचा वापर करावा लागताे. खड्ड्यांमुळे वाहतुकीदरम्यान शेतमालाचे नुकसान हाेत असून, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी हलक्या वाहनांचे नुकसानही हाेते. खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात हाेत असल्याने या मार्गाची पावसाळ्यापूर्वी दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पवनगावच्या सरपंच नेहा राऊत, माजी सरपंच किरण राऊत, घोरपडच्या सरपंच तारा कडू, लिहिगावचे सरपंच गणेश झोड, घोरपडचे उपसरपंच अनिकेत वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश ढोणे, आशा कुरुळकर, प्रकाश खांडेकर, गीता पांडे, सुनीता कार्वेकर, भारती मानमुंडरे, राजपल्लवी जयस्वाल, कुणाल कडू, शारदा मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.