कामठीची भुयारी गटार योजना एक तपापासून थंडबस्त्यात; २२ कोटींचा प्रकल्प गेला ३२ कोटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 04:20 PM2022-12-07T16:20:59+5:302022-12-07T16:22:14+5:30
कामठीच्या भुयारी गटार योजनेसाठी २०१० मध्ये २२ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता
सुदाम राखडे
कामठी (नागपूर) : विदर्भात महत्त्वाचे शहर असलेल्या कामठीला स्मार्ट करण्याचा संकल्प अनेकदा झाला. मात्र शहरातील भुयारी गटार प्रकल्पाच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी जागा न मिळाल्यामुळे ही योजना गत १२ वर्षांपासून रखडली आहे. २२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता ३२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंत्राटदाराच्या दुर्लक्षपणा व राजकीय अनास्थेमुळे या प्रकल्पाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कामठी शहरातील घाणीची समस्या कायमची सुटावी यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री व रामटेकचे खासदार मुकुल वासनिक यांच्या आग्रहातून कामठीच्या भुयारी गटार योजनेसाठी २०१० मध्ये २२ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता. यानंतर १३ जून २०१०ला मुकुल वासनिक यांच्या हस्ते या योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचे कंत्राट श्रद्धा इंटरप्रायजेस, नाशिक या कंपनीला देण्यात आला होता.
भुयारी गटारीसाठी शहरातील विविध मार्गांवरील पक्के रस्ते तोडून पाइप-लाइन टाकण्यात आली. यानंतर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या प्रकल्पाचे काम बंद पडले. यानंतर २२ कोटी रुपयात भुयारी गटार योजना पूर्ण होणार नाही. त्यासाठी शासनाने योजनेची रक्कम वाढून देण्याचा प्रस्ताव नगर परिषदेने घेतला. शासनाकडून ३२ कोटींच्या सुधारित प्रकल्पाला मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. मात्र भ्रष्टाचाराचे आरोप आणि राजकीय कुरघोड्यामुळे हा प्रकल्प वास्तवात साकारू शकला नाही.
भुयारी गटार योजनेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राला पाच एकरांची जागा आवश्यकता आहे. जागा उपलब्ध न झाल्यामुळे दि. १ जानेवारी २०२१ला कामठी नगर परिषदेच्या नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला. यात भुयारी गटार योजनेच्या सांडपाणी प्रक्रियेसाठी पाच एकर जागा रामगड परिसरात विकास आराखड्यात मंजूर करण्यात आली. ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
संदीप बोरकर, मुख्य अधिकारी, कामठी नगर परिषद