कामठीत पं.स. उपसभापती मल्लेवार यांचे पद धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:33+5:302021-03-20T04:07:33+5:30
कामठी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कामठीत तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील दोन जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यपद रद्द झाले आहे. पंचायत समितीच्या ...
कामठी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कामठीत तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील दोन जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यपद रद्द झाले आहे. पंचायत समितीच्या दोन सदस्यांनाही या निर्णयाचा फटका बसला आहे. त्यामुळे पंचायत समितीचे उपसभापती आशिष मल्लेवार यांची अडचण वाढणार आहे.
कामठी पंचायत समितीअंतर्गत आठ गण आहेत. वर्षभरापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपचे प्रत्येकी चार सदस्य विजयी झाले होते. सभापतिपदी सर्वसाधारण प्रवर्गातून भाजपचे उमेश रडके यांची तर उपसभापतिपदी काँग्रेसचे आशिष मल्लेवार यांची ईश्वर चिठ्ठीने वर्णी लागली. वर्षभरापूर्वी पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. इकडे जि.प.त ५० टक्क्यापेक्षा अधिक आरक्षण झाल्याने ओबीसी प्रवर्गातील सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यात तालुक्यातील वडोदा बीडगाव सर्कलच्या कॉँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे व गुमथळा सर्कलचे भाजपचे अनिल निधान यांचा समावेश आहे. यानंतर आता पंचायत समितीमधील ओबीसी प्रवर्गातील १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी काढले. त्यात कामठी पंचायत समितीच्या बीडगाव गणातून ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेले काँग्रेसचे सदस्य व कामठी पंचायत समितीचे उपसभापती आशिष मल्लेवार तसेच महालगाव गणातील ओबीसी (महिला) प्रवर्गातून विजयी झालेल्या भाजपच्या शीला हटवार यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे मल्लेवार यांचे उपसभापतिपद धोक्यात आले आहे. इकडे पंचायत समिती गणाचे सुधारित आरक्षण २३ मार्चला तहसील कार्यालयात होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.