नागपुरातील कांबळे दुहेरी हत्याकांड : आणखी एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:36 AM2018-03-23T00:36:00+5:302018-03-23T00:36:12+5:30
उषा आणि राशी कांबळे या आजी-नातीच्या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. अंकित शाहू (वय २२, रा. पवनसूतनगर, दिघोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उषा आणि राशी कांबळे या आजी-नातीच्या दुहेरी हत्याकांडात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली. अंकित शाहू (वय २२, रा. पवनसूतनगर, दिघोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता चार झाली आहे.
उषा सेवकदास कांबळे (वय ५४) आणि दीड वर्षीय राशी रविकांत कांबळे या दोघींची १७ फेब्रुवारीला गळा कापून हत्या करण्यात आली होती. दोघींचेही मृतदेह पोत्यात कोंबून आरोपींनी विहीरगावजवळच्या नाल्यात फेकले होते. या हत्याकांडाने सर्वत्र खळबळ उडाली होती. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी मुख्य आरोपी गणेश शाहू आणि त्याची पत्नी गुडिया यांना अटक केली तर, त्याच्या एका १७ वर्षीय नातेवाईकाला ताब्यात घेतले होते. त्यांच्या घरातून रक्ताने माखलेले कपडे, काही चीजवस्तू आणि खिडकीचे पडदे जप्त केले होते. या हत्याकांडात आणखी काही आरोपी असावेत, असा दाट संशय होता. मात्र, प्रकरणाचा तपास करणारे एसीपी किशोर सुपारे यांनी संशयास्पद भूमिका वठवून अन्य आरोपींना दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावेही त्यांनी दुर्लक्षित केली. एवढेच नव्हे तर पीडित परिवाराला धाक दाखविण्याचाही सुपारेंनी उद्दामपणा केला. त्यामुळे त्यांना या प्रकरणाच्या तपासातून दूर करण्याची मागणी पत्रकारांनी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्याकडे केली. सुपारेंच्या संशयास्पद भूमिकेचे किस्सेही पत्रकारांनी आयुक्तांना ऐकविले. त्याची दखल घेत आयुक्तांनी सुपारेंकडून या तपासाची सूत्रे काढून ती एसीपी राजरत्न बनसोड यांच्याकडे सोपविली होती. बनसोड यांनी नव्याने या प्रकरणाची सूक्ष्म चौकशी सुरू केली. त्यात महत्त्वपूर्ण पुरावे हाती आल्यानंतर त्यांनी गणेश शाहूचा लहान भाऊ अंकित शाहू याला गुरुवारी चौकशीसाठी बोलवून घेतले. त्याची तीन ते चार तास कसून चौकशी केल्यानंतर रात्री अंकितला अटक करण्यात आली.
----
एसीपी सुपारेंना का दिसले नाही?
अंकित शाहू उषा आणि राशी यांच्या हत्याकांडात प्रत्यक्ष सहभागी होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठीही त्याने मदत
केल्यासंबंधीचे ठोस पुरावे मिळाल्यामुळेच अंकितला अटक करण्यात आल्याची माहिती संबंधित पोलीस सांगतात. त्यामुळे हे पुरावे यापूर्वी तपास करणारे एसीपी सुपारे यांना का दिसले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.