कणखर ‘रॅम्बो’ नियतीपुढे हरला
By admin | Published: October 23, 2016 02:35 AM2016-10-23T02:35:21+5:302016-10-23T02:35:21+5:30
‘रॅम्बो’ हे त्याचे केवळ नावच नव्हते, तर तो त्याचा गुण झाला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत तो आपल्या नावाला जागला.
अपघातात जखमी झालेल्या उंटाचा मृत्यू : पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल
नागपूर : ‘रॅम्बो’ हे त्याचे केवळ नावच नव्हते, तर तो त्याचा गुण झाला होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत तो आपल्या नावाला जागला. प्राणांतिक जखमा असतानादेखील आठवडाभर त्याने मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेर नियतीसमोर त्याला शरण जावेच लागले. ही कणखर कहाणी कुठल्या हॉलिवूडपटातील हिरोची नसून नागपुरातील ‘रॅम्बो’ नावाच्या एका उंटाच्या जिद्दीची आहे. एका बेजबाबदार वाहनचालकाच्या वेगाच्या झिंगेने त्याचा बळी गेला.
मागील रविवारी अमरावती मार्गावर नागपूरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर एक उंट जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती प्राण्यांच्या उत्थानासाठी कार्यरत असणाऱ्या स्मिता मिरे यांना मिळाली. त्या तातडीने डॉ. पाटील या वैद्यकीय तज्ज्ञांसोबत तेथे पोहोचल्या. उंटाला चालण्यात अडचण येत होती व त्याचा मालक हताशपणे बसून होता. संबंधित उंट नागपुरातील एका ‘रिसॉर्ट’वर भाड्याने लावला होता असे त्याने सांगितले. ‘रिसॉर्ट’चालकांना याची माहिती कळल्यावर त्यांनी उंटावर उपचार सुरू केले. मात्र तेथे फार सोयी नसल्यामुळे मिरे यांनी उंटाला नागपुरातील पशुवैद्यकीय इस्पितळात आणले. उंटाला गाडीच्या मदतीने आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ‘रॅम्बो’ त्याला तयारच नव्हता. जखमी असतानादेखील तो चालत इस्पितळापर्यंत आला.
उंटाची सखोल तपासणी झाल्यावर इस्पितळातील वैद्यकीय तज्ज्ञांनी आश्चर्यच व्यक्त केले. ‘रॅम्बो’चा जबडा तुटला होता. त्याचा पाय ‘फ्रॅक्चर’ होता व त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला होता. अशा स्थितीत उंट जिवंतच कसा राहिला, असा प्रश्न त्यांना पडला. वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्यामुळे शनिवारी रात्री त्याने अखेरचा श्वास घेतला. (प्रतिनिधी)
पोलिसांत तक्रार, आरोपीला अभय नको
दरम्यान, ‘रॅम्बो’चा मालक असलेल्या तरुणाचे घर या उंटावरच चालत होते. डोळ्यासमोर उंटाचा झालेला अपघात आणि नंतर झालेला मृत्यू यामुळे तो हताश झाला आहे. शनिवारी वाडी पोलीस ठाण्यात संबंधित वाहनचालकाविरोधात तक्रार करण्यात आली व पोलिसांनी कलम २७९, ४२९, १९६, १३४, १७७ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाहनाच्या क्रमांकावरुन त्याचा शोध सुरू आहे. संबंधित वाहनचालक नागपूर जिल्ह्यातीलच एका गावाचा सरपंच असून तो राजकीय दबाव आणत आहे. मात्र त्याच्या चुकीमुळे एका उंटाचा जीव गेला असून त्याच्यावर कठोर कारवाई व्हायलाच हवी, असे मत स्मिता मिरे यांनी व्यक्त केले.