कान्हा देवकीचा की यशोदेचा ?

By admin | Published: May 15, 2015 02:36 AM2015-05-15T02:36:03+5:302015-05-15T02:36:03+5:30

कान्हा जन्मदात्या देवकीचा की संगोपन करणाऱ्या यशोदेचा, या प्रश्नची उकल या युगातही झालेली नाही.

Kanha Devaki's Yashoda? | कान्हा देवकीचा की यशोदेचा ?

कान्हा देवकीचा की यशोदेचा ?

Next

नागपूर : कान्हा जन्मदात्या देवकीचा की संगोपन करणाऱ्या यशोदेचा, या प्रश्नची उकल या युगातही झालेली नाही. काहीसा असाच एक प्रश्न एका फौजदारी प्रकरणाच्या स्वरूपात सत्र न्यायालयात सुनावणीस आला. हे प्रकरण यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. यशोधरानगर भागात राहणाऱ्या एका तरुणीचे दोन मुलांचा बाप असलेल्या एका विवाहित इसमासोबत प्रेमसंबंध होते. या संबंधातून ती गरोदर राहिली. २३ आॅगस्ट २०१४ रोजी तिला मुलगा झाला. प्रियकराने तिला आणि मुलास धुडकावले होते.
दुर्दैव असे की मुलाला जन्मताच कावीळ झाला होता. त्याची प्रकृती चिंताजनक होती. ही तरुणी अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने तिच्याकडे मुलाच्या उपचाराची सोय नव्हती. तिचे वडील एका होजियरीच्या दुकानात नोकरी करतात. त्यांनी ही बाब आपल्या मालकास सांगून मदतीची याचना केली होती.
मोमीनपुरा भागातीलच व्यवसायी मोहम्मद वकील आणि त्यांची पत्नी निखत जहाँ हे या तरुणीच्या मदतीस धावून आले. त्यांनी मुलास आधी डॉ. भिसीकर यांच्या इस्पितळात, त्यानंतर डॉ. मोहीबुल हक यांच्या इस्पितळात नेऊन वाचविण्याची धडपड केली. मुलाला इस्पितळात १५ दिवस भरती ठेवण्यात आले. तो बचावला. या दाम्पत्याने या मुलावर पन्नास-साठ हजार रुपये खर्च केले. पुढे तीन महिनेपर्यंत मुलावर उपचार करण्यात आले. १ लाख २० हजार रुपये खर्च आला.
हे दाम्पत्यच आपल्या मुलाचे खरे काळजी वाहक आहेत. त्यांच्यामुळेच आपला मुलगा वाचला, अशी जाणीव या कुमारी मातेला झाली. तिने आणि तिच्या वडिलाने मुलाला या दाम्पत्यास दत्तक देण्याची इच्छा व्यक्त केली. १० आॅक्टोबर २०१४ रोजी दत्तक घेण्याचा ‘हकिका’ हा कार्यक्रम पार पडला. या मातापित्याने मुलाचे नामकरण केले. लागलीच २७ आॅक्टोबर रोजी दत्तक विधान करण्यात आले. ते नोटरीपुढे पंजीबद्ध करण्यात आले होते. त्यात या मुलीच्या वडिलांसह पाच जणांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
पुढे या तरुणीने आपल्या या प्रियकरासोबत ८ फेब्रुवारी २०१५ रोजी संघर्षनगरातील एका मदरसा येथे निकाह केला. निकाहनंतर तिचे मनपरिवर्तन होऊन तिने मोहम्मद वकील आणि निखत जहाँ यांच्याकडे मुलगा परत करण्याची मागणी केली. परंतु मुलासोबत अतिशय लळा निर्माण झाल्याने त्यांनी मुलास परत करण्यास नकार दिला. परिणामी या तरुणीने त्यांच्याविरुद्ध यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होऊन आपणास अटक होईल, अशा भीतीने या दाम्पत्याने आणि अन्य तिघांनी अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांच्या मार्फत अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयाने त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kanha Devaki's Yashoda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.