वीज निर्मिती केंद्राच्या फ्लाय ॲशमुळे कन्हान नदीचे पाणी दूषित
By मंगेश व्यवहारे | Published: July 3, 2024 01:26 PM2024-07-03T13:26:11+5:302024-07-03T13:26:38+5:30
शहरातील पाणी पुरवठ्यावर मर्यादा : औष्णिक वीज केंद्राला उपाययोजना करण्याची विनंती
नागपूर : दरवर्षी पावसाळ्यात शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या कन्हान नदीत औष्णिक वीज केंद्रातील राख मिसळत असल्यामुळे कन्हान नदीचे पाणी दूषित होते. यंदाही १ जुलै रोजी कन्हान नदीच्या पाण्यात फ्लाय ॲश आढळून आल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्रातून पंम्पिंग बंद करावी लागली. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा मर्यादित करण्यात आला. सद्या पावसाळा सुरू झाला आहे. पुढे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास वारेगावच्या राखेचा तलाव फुटल्यास शहरात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरडखेडा या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळश्यातून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे वारंवार आदेश दिले आहे. खापरखेडा वीज केंद्रातील फ्लाय ॲश कन्हान नदीत मिसळल्याने पाणी दूषित झाले आहे. १ जुलै रोजी दुपारी कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या जल वसाहतीच्या विहीरीजवळ नदीत ओसीडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांना औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख आढळली. दरम्यान अधिकाऱ्यांनी राखेचा स्त्रोत शोधले. यात महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या वारेगाव येथील राखेचा तलाव आणि वारेगाव येथील राख साठवणूक केंद्रातून ही राख नदीत येत असल्याचे दिसून आले. या राखेमुळे नदीतील पाणी दूषित होऊन नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही राख नदीच्या पाण्यात जाण्यापासून थांबविण्यासाठी आवश्यक उपाय करण्याची विनंती केली गेली आहे. राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित होत आहे. नागरीकांना शुद्धा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी
ओसीडब्ल्यूकडूनही कन्हान जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरात आवश्यक उपाय करण्याचे काम हाती घेतले आहे. खबरदारी म्हणून राख आढळलेल्या जलवसाहत परिसरातील विहीरींचे पंपही थांबविण्यात आले आहे. पाण्याची तपासणी केली जात असल्याचे ओसीडब्ल्यूने कळविले आहे. औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेमुळे कन्हान नदीतील पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे कन्हान शुद्धीकरण केंद्र सद्या त्याच्या मुळ क्षमतेच्या दोन तृतियांश क्षमतेनेच कार्यरत आहे.
- अशोक चौक येथे जलवाहिनीच्या इंटरकनेक्शनसाठी १८ तास शटडाऊन
गुरुवार, ४ जुलै रोजी दुपारी ४ वाजतापासून अशोक चौकातील जलवाहिनीच्या इंटरकनेक्शनसाठी १८ तासाचे शटडाऊन घेण्यात आले आहे. शुक्रवारी ५ जुलैला सकाळी १० वाजेपर्यंत काम पूर्ण होणार असल्याने, त्या काळात रेशीमबाग व हनुमाननगरच्या कमांड एरीयातील वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. अशोक चौकात उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी ४०० मिमी व्यासाची जलवाहिनीला इतर ठिकाणी हलवायचे आहे.