ट्रेनच्या धडकेत कानपूरच्या कंपनी व्यवस्थापकाचा मृत्यू
By नरेश डोंगरे | Updated: January 5, 2024 23:01 IST2024-01-05T23:01:27+5:302024-01-05T23:01:54+5:30
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते विजयनगर कानपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होते

ट्रेनच्या धडकेत कानपूरच्या कंपनी व्यवस्थापकाचा मृत्यू
नागपूर : लुप लाईन क्रॉस करताना भरधाव ट्रेनची धडक बसल्याने एका टेक्सटाईल्स कंपनीच्या व्यवस्थापकाचा करुण अंत झाला. काटोल रेल्वे स्थानकावर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. योगेंद्रनारायण शिवनारायण गुप्ता (वय ५३) असे मृताचे नाव आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते विजयनगर कानपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी होते. काटोलच्या निर्मल टेक्सटाईल्स कंपनीत ते मॅनेजर होते. शुक्रवारी दुपारी ते काटोल स्थानकाजवळची लूप लाईन ओलांडत असताना भरधाव ट्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांचा करुण अंत झाला. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांसह मोठ्या संख्येत नागरिकांनी तिकडे धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी गुप्ता यांच्या कपड्याची तसेच बॅगची तपासणी केली असता ओळखपत्र सापडले. त्यावरून त्यांचे नाव आणि पत्ता माहित पडला. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी गुप्ता यांच्या कंपनीतील सहकाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कळविली. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.