करंजीकर, रानडे, होळकर यांचा ‘जनस्थान आयकॉन’ने सन्मान : अशोक बागवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 01:50 AM2022-06-24T01:50:15+5:302022-06-24T01:51:07+5:30
नाशिक : एकाच व्यासपीठावरून विविध कला आणि कलाकारांचा सन्मान करण्याची ही प्रथा खूप अनोखी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक ...
नाशिक : एकाच व्यासपीठावरून विविध कला आणि कलाकारांचा सन्मान करण्याची ही प्रथा खूप अनोखी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ लेखक कलाकार दीपक करंजीकर, ज्येष्ठ कवी प्रकाश होळकर आणि ग्रंथ तुमच्या दारी योजेनेचे शिल्पकार विनायक रानडे यांना जनस्थान आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कारप्रसंगी बागवे बोलत होते. यावेळी विनायक रानडे यांनी ग्रंथपेटीची योजना आतापर्यंत भारतासह जगातील १५ देशांमध्ये पोहोचली असल्याचे सांगितले. तसेच जगभरात जिथे मराठी माणूस आहे, तिथपर्यंत ही योजना पोहोचविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रकाश होळकर आणि दीपक करंजीकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्व कलाकारांना एकत्र आणण्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी जनस्थान ग्रुपच्या उपक्रमांची चित्रफीत दाखविण्यात आली. तसेच कवी राजू देसले, भूषण मठकरी, रागिणी कामतीकर, महेश आंबेरकर, संकेत बरडिया, सुमुखी अथणी, राजा पाटेकर, संजय गिते, निवेदिता मदाने-वैशंपायन, दत्ता पाटील, क्षमा देशपांडे, ज्ञानेश्वर कासार, आनंद अत्रे, संदीप लोंढे, मिलिंद गांधी, सचिन शिंदे, अमोल पाळेकर आणि नूपुर सावजी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशिष रानडे यांच्या नांदीने कार्यक्रमाला प्रारंभ झाल्यानंतर प्रास्ताविक अभय ओझरकर, सूत्रसंचालन स्वानंद बेदरकर यांनी, तर आभार विनोद राठोड यांनी मानले.
.