कारगीलमुळे देशाचा खरा अर्थ समजला
By admin | Published: July 26, 2016 02:36 AM2016-07-26T02:36:55+5:302016-07-26T02:36:55+5:30
उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही....
रणधुमाळीत सत्याचाच विजय : प्रतिकूल परिस्थितीत जवानांनी दाखविली जिगर
आज कागरिल विजय दिवस
नागपूर : उंचावर बसलेला शत्रू नेमका कुठून वार करेल याची अनिश्चितता, हवामानाचे आव्हान आणि पुढे काय होईल याची काहीच शाश्वती नाही. अशा स्थितीत आमच्यासोबत होते ते घरच्यांसोबतच कोट्यवधी भारतीयांचे आशीर्वाद.
त्यांच्या आशांना पूर्ण करण्याची आमच्यावर जबाबदारी होती आणि आमच्या विश्वासाला साथ मिळाली ती बलशाली अशा बोफोर्स तोफांची. ज्यावेळी टायगर हिलवर तिरंगा फडकला तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचा खरा अर्थ समजला. या भावना आहेत कारगीलच्या युद्धात लढलेल्या व सध्या नागपुरात कार्यरत असलेल्या एका जिगरबाज जवानाच्या.
संबंधित जवानाने नाव न छापण्याच्या अटीवरच आपल्या भावना लोकमतजवळ व्यक्त केल्या. सुरुवातीला कारगील व द्रास येथे नेमके काय होत आहे याचा अंदाजच आला नाही. ज्यावेळी खरी परिस्थिती समोर आली तेव्हा खूप उशीर झाला होता. मृत्यू गोळी किंवा बॉम्बगोळ्याच्या रूपात कुठून येईल याचा कुठलाही भरवसा नव्हता. शिवाय कडाक्याची थंडी असल्यामुळे हातपायदेखील गारठत होते. सर्वच बाबी प्रतिकूल होत्या. परंतु तरीदेखील भारतीय जवानांचे धैर्य वाखाणण्याजोगे होते. प्राण पणाला लावून सैनिक वर चढण्याचा प्रयत्न करत होते. कपडे, पाणी, अन्न यांची सुरुवातीला कमतरता जाणवली. परंतु या परिस्थितीत सैनिकांना सर्वात जास्त आधार वाटला तो तोफगोळा पथक व बोफोर्स तोफांचा. या पथकामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जवानांचा विजय साकार केला. ज्या वेळी युद्धात भारताचा विजय झाला तेव्हा मनातील भावना व्यक्त होत नव्हत्या.
मनाला समाधान होते देशाची सेवा केल्याचे, परंतु दु:ख होते एकाहून एक जिगरबाज जवान व अधिकारी गमाविल्याचे. आज कारगील युद्धाला वर्ष झाले. परंतु प्रत्येक क्षण मनात ताजा आहे, असे सांगत असताना जवानाच्या चेहऱ्यावर अभिमानाचे भाव होते. (प्रतिनिधी)
डोळ्यातील अश्रू हिंमत द्यायचे
आमच्या समोर अनेक भारतीय जवान शहीद झाले. तर अनेक जण जखमीदेखील झाले. जखमी सैनिकांना सुरक्षितस्थळी नेण्याचेदेखील मोठे आव्हान होते. परंतु हे आव्हानदेखील प्राणांची पर्वा न करता जवानांनी पार पाडले. शहीद जवानांना पाहून काही क्षणांसाठी डोळ्यात अश्रू यायचे. परंतु यामुळे शत्रूला सडेतोड उत्तर देण्याचे बळ मिळायचे, असे या शूरवीराने सांगितले.