करकरेंची हत्या हिंदुत्ववादी पोलिसांनी केली : बी.जी.कोळसे पाटलांच्या वक्तव्याने नवे वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 09:46 PM2020-02-17T21:46:38+5:302020-02-17T21:49:37+5:30

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन ‘एटीएस’ प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नव्हे तर काही हिंदुत्ववादी पोलिसांनी केली होती, असा खळबळजनक आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे.

Karkare's murdered by pro-Hindu police: BG Kolse Patil's statement sparks new controversy | करकरेंची हत्या हिंदुत्ववादी पोलिसांनी केली : बी.जी.कोळसे पाटलांच्या वक्तव्याने नवे वादंग

करकरेंची हत्या हिंदुत्ववादी पोलिसांनी केली : बी.जी.कोळसे पाटलांच्या वक्तव्याने नवे वादंग

Next
ठळक मुद्देकर्नल पुरोहितने रचला सरसंघचालकांच्या हत्येचा कट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन ‘एटीएस’ प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नव्हे तर काही हिंदुत्ववादी पोलिसांनी केली होती, असा खळबळजनक आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवे वादंग निर्माण झाले असून, भारतीय जनता पक्षाने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
नागपुरातील जाफरनगर भागात रविवारी रात्री ‘अलायन्स अगेन्स्ट सीएए-एनआरसी-एनपीआर’च्या वतीने संविधान जनजागरण सभा आयोजित करण्यात आली होती. ‘सीएए’, ‘एनआरसी’च्या विरोधात बोलत असताना बी.जी.कोळसे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणादरम्यान अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. हेमंत करकरे यांचा मृत्यू कसाब किंवा इतर कोणत्याही पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गोळ्यांनी झाला नाही. तर करकरे यांना महाराष्ट्र पोलिसांच्या ‘पॉईंट नाईन’ या पिस्तुलाने पाठीमागून गोळ्या घालून ठार करण्यात आले. हे कृत्य मुंबई पोलीस दलातील कुणी हिंदुत्ववाद्याने केले असावे, असा दावा कोळसे पाटील यांनी केला.
मालेगाव बॉम्बहल्ला प्रकरणात अनेक वर्षे अटकेत असलेल्या कर्नल पुरोहितने सुरुवातीला विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावर काम केले होते. परंतु त्यानंतर त्याच कर्नल पुरोहितने त्यांच्या हत्येचा कट रचला होता व तशी सुपारीदेखील काही ‘शार्पशूटर्स’ला दिली होती, असा आरोपदेखील बी.जी.कोळसे पाटील यांनी केला.

अटलबिहारी वाजपेयींविरोधात वादग्रस्त विधान
या कार्यक्रमादरम्यान बी.जी.कोळसे पाटील यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासंदर्भातदेखील वादग्रस्त विधान केले. अटलबिहारी वाजपेयी हे प्रत्येक विदेशी दौऱ्यावर महिलांना सोबत न्यायचे. हे त्यांचे हिंदुत्व होते. ५ डिसेंबर १९९० रोजी दिलेल्या भाषणात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासला होता, असेदेखील बी.जी.कोळसे पाटील म्हणाले.

भाजपची आक्रमक भूमिका, पोलिसांत तक्रार
बी.जी.कोळसे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याविरोधात भाजयुमोच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे तक्रारदेखील केली आहे. कोळसे पाटील यांनी जाणूनबुजून समाजात तेढ निर्माण होईल अशी वादग्रस्त वक्तव्ये केली. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविरोधात अवमानजनक व आक्षेपार्ह विधाने केली. त्यांच्या भाषणाची चौकशी व्हावी व त्यांच्याविरोधात तसेच आयोजनकर्त्यांविरोधात कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजयुमोतर्फे शहराध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, जितेंद्र ठाकूर, राहुल खंगार, बाल्या रारोकर यांनी तक्रार दाखल केली. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनीदेखील बी.जी.कोळसे पाटील यांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.

Web Title: Karkare's murdered by pro-Hindu police: BG Kolse Patil's statement sparks new controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.