कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई अमित शहांसमोर खोटे बोलले, जयंत पाटलांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 07:53 AM2022-12-22T07:53:56+5:302022-12-22T07:54:25+5:30
बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे.
नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी अमित शहांनी मध्यस्थी केली असली, तरी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांच्यासमोर खोटं बोलल्याचा दावा जयंत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केला.
बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. सीमाप्रश्नी बोम्मईंनी केलेले ट्विट्सही चर्चेचा विषय ठरले होते. या पार्श्वभूमीवर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी करून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्त बैठक घेतली. याच बैठकीत बोम्मई यांनी वाद निर्माण करणारं ट्विट फेक असल्याचा दावा केला होता. या मुद्द्यावरून बुधवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चा झाली. यावेळी जयंत पाटील यांनी उपरोक्त दावा केला. मॉर्फ्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातून संबंधितांची बदनामी होत असल्याचा मुद्दा बुधवारी अधिवेशनात चर्चेला आला. त्यावर चर्चा होत असताना, ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड आहे की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असल्याचा मुद्दा अशोक चव्हाण यांनी मांडला.
जर महाराष्ट्राबाबत चिथावणी देणाऱ्या गोष्टी त्या अकाउंटवर असतील, तर आपण त्यावर काय भूमिका घेणार? ते व्हेरिफाइड अकाउंट आहे. त्यामुळे ते फेक आहे, असं सांगून आपण त्याची पाठराखण का करायची?, असा सवाल चव्हाण यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी हे केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर सांगितलंय. मी स्वत: केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवेन’, असे सांगितले.
जयंत पाटील यांचा दावा
‘बोम्मईंनी जे ट्विट केलंय, त्याबाबत कर्नाटकच्या विधानसभेत तासाभरापूर्वी चर्चा झाली. त्यांनी आपल्या ट्विट्सपासून घुमजाव का केलं? असा आक्षेप कर्नाटकच्या विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घेतला आहे. त्यामुळे बोम्मईंचं ट्विट खरंच आहे. ते गृहमंत्र्यांसमोर जे बोलले, ते खरं नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे’, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
फडणवीसांचा टोला
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंत पाटील यांना खोचक शब्दांत टोला लगावला. ‘जयंत पाटील यांनी या विधानसभेत जास्त लक्ष द्यावं. कर्नाटकच्या विधानसभेत कमी लक्ष द्यावं. तिथे काय घडलं, याची खात्रीशीर माहिती घेऊ आणि मग त्यावर चर्चा करू’, असे फडणवीस म्हणाले.