काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:51 AM2019-04-22T11:51:23+5:302019-04-22T11:52:11+5:30
वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काश्मीरला आपण सर्व एका राज्याच्या रूपात ओळखतो. त्याच्या सुंदरतेबाबत वर्णन केले जाते. मात्र आपण काश्मीरची विशेषता जाणलीच नाही किंवा आपल्याला याबाबत सांगितले गेले नाही. वास्तवात काश्मीर हे ज्ञानाचे केंद्र राहिले आहे. काश्मीरने भारतात ज्ञानाचे सृजन केले आहे पण ही सत्यता आपण विसरलो आहे, अशी खंत काश्मीर व्यवहाराचे जाणकार आणि प्रसिद्ध वक्ते सुशील पंडित यांनी व्यक्त केली.
मंथनच्यावतीने ‘जम्मू और कश्मीर का सत्य’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी हे विचार मांडले. त्रिमूर्तीनगर येथील आयटी पार्कच्या पर्सिस्टंट सिस्टीम सभागृहात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ते पुढे म्हणाले, काश्मीर भारताचे अंग नाही, असे म्हणने पूर्णपणे चुकीचे आहे. काश्मीर हे महाभारत काळापासूनच भारताचे अभिन्न अंग राहिले आहे. इतिहासातील सर्वात पुरातन मानला जाणारा ‘राजतरंगिनी’ हा ग्रंथ काश्मिरातच लिहिला गेला होता. महाऋषी पतंजली यांचा जन्मही काश्मिरातच झाला होता. संगीतावरील सर्वात पहिला ग्रंथ शरणदेव यांनी काश्मीरमध्येच लिहिला होता. एवढेच नाही तर ध्वनीवर आनंदवर्धन यांचे सर्वश्रेष्ठ पुस्तकही काश्मीरमध्येच लिहिले होते. त्यामुळे काश्मीर हे केवळ एक राज्य नसून भारताचे डोके आणि मेंदू आहे. मात्र आपल्याला हे कधीच शिकविले जात नाही.
ललितादित्य हे काश्मीरचे सर्वात शक्तिशाली शासक होते व त्यांचे कार्यक्षेत्र दूरवर विस्तारले होते. त्यांच्याबाबत आपल्याला कधी सांगितलेच गेले नाही. महमूद गजनी हा काश्मीरमधून तीन वेळा पराजित होऊन परतला होता, मात्र तेही सांगितले गेले नाही. ज्ञानाचे केंद्र राहिलेल्या काश्मीरमध्ये नाट्यशास्त्रावर ध्वनिलोक, संगीत रत्नाकर यासारखे महान ग्रंथ लिहिले गेल्याची माहिती त्यांनी यावेळी सांगितली.
काश्मिरी पंडितांवरील अत्याचार दुर्लक्षित केला
यावेळी सुशील पंडित यांनी काश्मिरी पंडितावर झालेल्या अत्याचाराबाबत कधी दखल घेतली गेली नाही, अशी खंत व्यक्त केली. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्यावेळी ब्रिटिश शासन नव्हते तर आपले सरकार आणि आपलेच शासन-प्रशासन होते. अत्याचाराच्या घटना मोठ्या होत्या. मात्र याबाबत बातमी झाली नाही, कधी चौकशी झाली नाही आणि कधी कुणावर खटला चालविला गेला नसल्याचा असंतोष त्यांनी यावेळी व्यक्त केला.