काश्मीरचा हिंसाचार निव्वळ एक ड्रामा; मेजर गौरव आर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:32 AM2018-10-24T11:32:24+5:302018-10-24T11:33:24+5:30
काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत. या हिंसाचारामुळे त्यांचा तिजोऱ्या भरत आहे. त्यांना तिथे कधीच शांतता नको आहे. काश्मीरबद्दलची देशाची ठोस पॉलिसी नसल्यामुळे हिंसाचाराचा ड्रामा वर्षानुवर्षे सुरू असल्याचे मत मेजर गौरव आर्य यांनी व्यक्त केले.
जम्मू काश्मीर स्टडी सर्कलद्वारे काश्मीर विलय दिवसानिमित्त मेजर गौरव आर्य यांच्या व्याख्यानाचे आयोजन मंगळवारी चिटणवीस सेंटर येथे करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून मीरा खडक्कार व स्टडी सर्कलचे संचालक मनु नायर उपस्थित होते. यावेळी त्यांनी काश्मीरच्या अवस्थेवर भाष्य करीत, तिथे सुरू असलेल्या हिंसाचाराला तेथील नेतेच खतपाणी घालत असून हा निव्वळ पॉलिटिकल ड्रामा असल्याचे म्हणाले. काश्मीरच्या आतंकवादाबद्दल बोलताना ते म्हणाले की, १९८९ च्या सुमारास काश्मिरात पाकिस्ताना आतंकवाद फोफावला. त्यावेळी १० हजारावर आतंकवादी काश्मिरात शिरले होते. उघड्यावर एके-४७ व पाकिस्तानचा झेंडा फडकवित होते. त्यावेळी भारतीय सेनेने सरकारला एक डॉक्युमेंट पाठविले.
सरकारने ते मान्य केल्यानंतर भारतीय सेनेने राष्ट्रीय रायफल सेना तयार करून पाठविली. या सेनेने आंतकवाद्यांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले. राष्ट्रीय रायफ ल सेनेने तेव्हा दररोज शेकडो एन्काऊंटर काश्मिरात केले.
आज तर काश्मिरात दीडशेही आंतकवादी नाहीत. त्यामुळे पाकिस्तानने तिथे आता इस्लामिक आयडॉलॉजी वापरणे सुरू केले आहे. काश्मिरात गेल्या १० वर्षात शेकडो मदरसे बनले आहे. यातून हिंसा शिकविली जात आहे. हिंसाचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर सुरू आहे. हिंसाचारात दगडफेक, जाळपोळ करण्यात येते, त्यांना पैसे दिले जात आहे. काश्मिरातले हे दोन्ही नेते त्यास जबाबदार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
- तर १५ वर्षे हवी राष्टपती राजवट
भारत सरकारला काश्मीरचा आतंकवाद संपवायचा असेल तर राष्ट्रपती राजवट किमान १० ते १५ वर्षासाठी लावली पाहिजे. हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या मदरशांना, सोशल मीडियातून हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या यंत्रणांवर निर्बंध लावावे लागेल. सर्जिकल स्ट्राईक करून फायदा नाही, तर पाकिस्तानी सेनेवर जबर हल्ला करणे गरजेचे आहे, असे आर्य म्हणाले.