कस्तुरबा गांधी स्वयंप्रेरित होत्या : हरिभाऊ केदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:35 PM2018-04-11T22:35:54+5:302018-04-11T22:36:10+5:30
कस्तुरबा या गांधीजींची सावली होत्या हे खरे आहे; पण म्हणून कस्तुरबांचे कार्य नजरेआड करता येणार नाही. त्या स्वयंप्रेरित होत्या. आपल्या कृतीतून त्यांनी समाजाला समर्पणाचा संदेश दिला, असे प्रतिपादन माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कस्तुरबा या गांधीजींची सावली होत्या हे खरे आहे; पण म्हणून कस्तुरबांचे कार्य नजरेआड करता येणार नाही. त्या स्वयंप्रेरित होत्या. आपल्या कृतीतून त्यांनी समाजाला समर्पणाचा संदेश दिला, असे प्रतिपादन माजी कुलगुरू प्रा. हरिभाऊ केदार यांनी केले. राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बुधवारी सर्वोदय आश्रमात ‘स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने आजच्या संदर्भात कस्तुरबा गांधी यांची प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लीलाताई चितळे होत्या. केदार पुढे म्हणाले, गांधीजींनी जे सत्याचे प्रयोग केले ते जगभरात गाजले. परंतु त्या प्रयोगांच्या यशस्वीतेच्या मुळाशी कस्तुरबाच होत्या. परंपरावादी कुटुंबात जन्मूनही त्यांनी समाजाला आधुनिक व प्रगतीचा विचार दिला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आज देशात अराजकता माजली आहे. समाज गौण झाला आणि राजकारण श्रेष्ठ ठरत आहे. संक्रमणाच्या या काळात या देशाचा सजग नागरिक म्हणून राज्यघटनेने आपल्या दिलेल्या शांतता व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण आपण केले पाहिजे. हीच कस्तुरबांचीही समाजला शिकवण होती, असे विचार लीलाताई चितळे यांनी व्यक्त केले. संचालन विशाखा बागडे यांनी केले.
मंगला सरोदे यांनी रंगवली स्वाभिमानी कस्तुरबा
या कार्यक्रमात मंगला सरोदे यांनी ‘मी कस्तुरबा बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाद्वारे स्वाभिमानी कस्तुरबा साकारली. गांधीजींच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभी राहणारी कस्तुरबा, गांधींजी स्वातंत्र्याची लढाई लढत असताना अनेक आघाड्यांवर एकहाती लढणारी लढवय्यी कस्तुरबा, कुटुंबासाठी हळवी होणारी कस्तुरबा मंगला सरोदे यांनी मंचावर प्रभावीपणे उभी केली.