कस्तूरचंद पार्कची ‘सर्कस’!

By admin | Published: July 11, 2016 02:30 AM2016-07-11T02:30:35+5:302016-07-11T02:30:35+5:30

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कस्तूरचंद पार्कचा प्रशासन व्यवसायिक उपक्रमासाठी उपयोग करीत आहे.

Kasturchand park's circus! | कस्तूरचंद पार्कची ‘सर्कस’!

कस्तूरचंद पार्कची ‘सर्कस’!

Next

पार्कची दुरावस्था व्यावसायिक कार्यक्रमांचा फटका प्रशासनाचे दुर्लक्ष
नागपूर : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या कस्तूरचंद पार्कचा प्रशासन व्यवसायिक उपक्रमासाठी उपयोग करीत आहे. आयोजकांकडून करण्यात आलेल्या घाणीमुळे पार्कची दुरावस्था झाली आहे. सकर्स कंपनीने या पार्कवर खोदकाम केल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने पार्कवर चिखल व घाण पसरली आहे. याचा फटका पार्कवर नियमित खेळणाऱ्या खेळाडूंना बसतो आहे. खेळाडूंनी पार्कच्या दुरवस्थेसाठी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

सीताबर्डी, सिव्हिल लाईन, सदर, मोमिनपुरा या भागातील मुलांना खेळण्यासाठी कस्तूरचंद पार्क हे एकमेव मैदान आहे. मॉर्निंग वॉकसाठी ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने परिसरातील लोक येथे येतात.
फुटबॉल, हॉकी, क्रिकेट आदी खेळ खेळल्या जातात. प्रशासन मात्र या मैदानाचा उपयोग व्यवसायिक उपक्रमासाठी करीत असल्याने गेल्या काही वर्षात येथील खेळाचे प्रशिक्षण वर्ग दुसरीकडे स्थानांतरित झाले आहे. तरीही परिसरातील मुले नियमित खेळाचा सराव करतात. उन्हाळ्यात खलाशी लेन क्रीडा प्रबोधिनीतर्फे खेळाचे शिबिर घेण्यात येते. यावर्षी उन्हाळ्यात प्रशासनाने मैदानाची एलआयसी चौकाकडील बाजू सर्कसला दिली.
उन्हाळाभर सर्कस चालली. पावसाळा लागताच सर्कस निघून गेली. सर्कसच्या काळात सुद्धा मुलांना येथे खेळणे कठीण जात होते. सर्कस चालकाने प्रेक्षक व सर्कसमध्ये काम करणाऱ्यांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या शौचालयाामुळे दुर्गंधी आणि घाण पसरलेली असायची. सर्कसमधील प्राणी सुद्धा घाण करायचे.
सर्कसमुळे मैदानाचा एक चतुर्थांश भाग व्यापला होता. पावसाळ्याच्या सुरुवातीला सर्कस निघून गेल्यामुळे मैदानात सर्वत्र चिखल व घाण पसरलेली आहे. पाण्याचे डबके साचलेले आहे. अतिशय वाईट अवस्था मैदानाची झाली आहे. (प्रतिनिधी)

कोण घेणार दखल?
प्रशासनामुळेच या मैदानाची दुरवस्था झाली आहे. सौरभ राव जिल्हाधिकारी असताना परिसरातील काही संस्थांनी बैठक घेऊन सर्कसला परवानगी न देण्याची विनंती केली होती. अभिषेक कृष्णा जिल्हाधिकारी असताना, मैदानात चार चाकी वाहने शिरू नये म्हणून सर्व गेटला टाळे ठोकले होते. मैदानाचा वापर खेळासाठी व्हावा यासाठी काही संघटना न्यायालयातसुद्धा गेल्या होत्या. मैदानाच्या होणाऱ्या दुरुपयोगाबद्दल वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. सध्या मैदानाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. प्रशासन निव्वळ महसूल मिळविण्याच्या नादात दुर्लक्ष करीत आहे.
-दिनेश नायडू, सचिव, परिवर्तन सिटीझन फोरम

मैदान खेळाडूंसाठी राहिलेच नाही
सर्कस बरोबर मैदानाच्या इतरही भागात उन्हाळाभर प्रदर्शन, मेळावे सातत्याने सुरू होते. या कार्यक्रमासाठी येणाऱ्यांची पार्किंग सुद्धा मैदानातच होत होती. त्यामुळे मैदानाचा निम्मा भाग खेळासाठी शिल्लक होता. या भागातही मैदानाच्या परिसरात उघड्यावर राहणारे लोक शौचासाठी वापर करीत असल्यामुळे येथे सदैव घाण पसरलेली असते. श्रीमोहिनी कॉम्प्लेक्सकडील मैदानाच्या भागात सावनेर व छिंदवाडाकडे जाणाऱ्या वाहनांचे पार्किंग करण्यात येते. त्यामुळे हे मैदान आता खेळाडूंसाठी राहिलेच नाही.
-चंद्रकांत वासनिक, खलासी लेन क्रीडा प्रबोधिनी

Web Title: Kasturchand park's circus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.