काटाेल-सावरगाव मार्ग धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:11 AM2021-02-26T04:11:13+5:302021-02-26T04:11:13+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : तालुक्यातील काटाेल-सावरगाव हा मार्ग महत्त्वाचा असून, ताे मध्य प्रदेशाला जाेडलेला असल्याने त्यावर २४ तास ...

The Katail-Savargaon road is dangerous | काटाेल-सावरगाव मार्ग धाेकादायक

काटाेल-सावरगाव मार्ग धाेकादायक

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : तालुक्यातील काटाेल-सावरगाव हा मार्ग महत्त्वाचा असून, ताे मध्य प्रदेशाला जाेडलेला असल्याने त्यावर २४ तास रहदारी असते. त्यात रेती व इतर ओव्हरलाेड वाहनांची भर पडली आहे. दाेन वर्षांपासून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी या धाेकादायक बनलेल्या मार्गाच्या रुंदीकरणासाेबतच त्यावर याेग्य उपाययाेजना करणे अत्यावश्यक आहे.

हा मार्ग मध्य प्रदेशासाेबच नागपूर जिल्ह्यातील नरखेड व सावनेर तालुक्याला जाेडला आहे. अलीकडच्या काळात या मार्गावरून हलक्या वाहनांसाेबतच जड व ओव्हरलाेड वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यात रेती व गिट्टीच्या ट्रक तसेच इतर मालवाहू वाहनांचा समावेश आहे. शिवाय, नरखेड व सावनेर तसेच पांढुर्णा व साैंसर (मध्य प्रदेश) तालुक्यांमधील नागरिक काटाेलला येण्यासाठी याच मार्गाचा नियमित वापर करतात. त्यामुळे या मार्गावरील रहदारीत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे.

दाेन वर्षांपासून या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. ते थांबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काेणत्याही उपाययाेजना केल्या जात नाही. या मार्गाचे रुंदीकरण करून राेडच्या कडेला असलेला भाग उंच सखल झाल्याने ताे सपाट करणे आवश्यक आहे, असेही काही जाणकार व्यक्तींनी सांगितले. हा भाग सपाट नसल्याने प्रसंगी वाहने राेडच्या उतरविताना त्रास हाेत असून, अपघात हाेत असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. त्यामुळे मार्गाचे रुंदीकरण करून याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी काटाेल, नरखेड व सावनेर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

....

अपघात प्रवण स्थळ

या मार्गावर अलीकडच्या काळात झालेल्या अपघातांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या मार्गावरील घुबडमेट हे ठिकाण अपघात प्रवण स्थळ बनले आहे. या ठिकाणाहून एक मार्ग येनवा मार्गे नरखेड, दुसरा तिष्टी मार्गे सावनेर, तिसरा सावरगावला जात असून, तर चाैथा मार्ग काटाेलला येताे. हाच मार्ग पुढे सावरगावहून वडचिचाेली (मध्य प्रदेश) मार्गे पांढुर्णा व पुढे छिंदवाडा व भाेपाळला महामार्गाला जाेडला आहे.

Web Title: The Katail-Savargaon road is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.