काठियावाड यांची शेतकऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:11 AM2021-08-13T04:11:49+5:302021-08-13T04:11:49+5:30
उमरेड : तालुक्यातील बोथली (ठाणा) परिसरात ४० जणांनी चार हजार लाल गाईंचा कळप मुक्कामी आणला आहे. अंदाजे १० किलोमीटर ...
उमरेड : तालुक्यातील बोथली (ठाणा) परिसरात ४० जणांनी चार हजार लाल गाईंचा कळप मुक्कामी आणला आहे. अंदाजे १० किलोमीटर परिसरात या जनावरांचे वास्तव्य असून शेतातील उभ्या पिकांची नासधूस करण्याचे प्रकार वाढले आहेत. यावरून शेतकरी संतापले असून काठियावाड यांना हटकले आणि चराईसाठी मनाई केली तर शेतकऱ्यांनाच शिवीगाळ, धमक्या आणि मारहाणीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी बुटीबोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
चारगाव येथील गुलाब सोनवणे, बाळा राऊत, विजय गिरसावळे तसेच घोटी येथील सुधाकर काटले या शेतकऱ्यांना मारहाणीचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात याबाबतच्या तक्रारीसुद्धा झाल्या. चारगाव, घोटी, ठाणा, बोथली, पिटीचुआ, बेंदोली, जुनापाणी, गुजर (देवळी) आदी परिसरात महिनाभरापासून हजारो जनावरांचे कळप वास्तव्याला आहेत. मौजा बोथली सर्व्हे नं. २०६/२१६ या परिसरात त्यांचा ठिय्या आहे.
ग्रामपंचायत बोथली(ठाणा)अंतर्गत असलेल्या रस्त्यालगत मनरेगा योजनेंतर्गत झाडे लावण्यात आलेली आहेत. त्या झाडांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान या जनावरांनी केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. शिवाय लगतच्याच परिसरात असलेल्या सोयाबीन, कपाशीच्या पिकातही जनावरे चराईसाठी सोडली जातात. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, उमरेड तहसीलदार, बुटीबोरी पोलीस स्टेशन तसेच बुटीबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडे सोपविण्यात आले आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेश लेंडे, सरपंच लीला गायकवाड, मायकल फ्रान्सिस, अन्सदास जॉन, मंदू नोरेल, बिजू अंतोनी, रॉबर्ट युनाथे, सुरेश कोळसे, राजेश जॉन, सचिन सत्यप्रकाश, बबलू पास्कल, मॉरिस जकार्यस आदींनी केली आहे.
-
ग्रामपंचायतीचा ठराव
ग्रामपंचायतअंतर्गत गावातील शेताजवळ मुक्काम करीत शेतकऱ्यांच्या शेतातील पीक उध्वस्त केले जात आहे. सोबतच शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली जात असून शेतकरी भीतीच्या सावटाखाली आहेत. अशावेळी पिकाच्या हंगामात नुकसानीस आळा बसावा यासाठी काठियावाड यांची जनावरे या परिसरात बसण्याची संमती देण्यात येऊ नये, असा ठराव बोथली (ठाणा) ग्रामपंचायतीने पारित केला आहे.
--