काटोल विधानसभा पोटनिवडणूक : भाजपात अनेक इच्छुक, मात्र अटींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 09:32 PM2019-03-12T21:32:01+5:302019-03-12T21:44:33+5:30
काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ्याला दिल्यास आणि उमेदवार जिंकल्यास निश्चित उमेदवार गोत्यात येण्याची भीती आहे. राज्यात भाजप-सेनेची युती झाल्याने शिवसेनेने उडी मारली आहे. पण भाजपाची दावेदारी जास्त आहे. काटोलमध्ये साडेतीन महिन्यासाठी कुणाला आमदार बनवायचे, हे राजकीय पक्षापुढे कन्फ्युजन आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपामध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. पण इच्छुकांनी जिंकल्यास पुढील वेळी कायम ठेवण्याची अट घातली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित मानला जात आहे. पण खर्चाची गणितं आड येत आहेत. पोटनिवडणुकीत उमेदवारी दुसऱ्याला दिल्यास आणि उमेदवार जिंकल्यास निश्चित उमेदवार गोत्यात येण्याची भीती आहे. राज्यात भाजप-सेनेची युती झाल्याने शिवसेनेने उडी मारली आहे. पण भाजपाची दावेदारी जास्त आहे. काटोलमध्ये साडेतीन महिन्यासाठी कुणाला आमदार बनवायचे, हे राजकीय पक्षापुढे कन्फ्युजन आहे.
भारतीय जनता पक्ष नागपूर शहरातील उमेदवार काटोलमधून उभा करण्यास इच्छुक आहे. पण स्थानिक इच्छुकांनीही पक्षाकडे आपली इच्छा प्रदर्शित केली आहे. किंबहुना पक्षाच्या निर्णयाप्रति नाराजीही व्यक्त करीत सूचक इशाराही दिला आहे; सोबतच अटसुद्धा पक्षापुढे ठेवली आहे. दोन्ही निवडणुकीत खर्च करायला हरकत नाही. पण पोटनिवडणुकीत निवडून आल्यास पुन्हा संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती नसल्याने दोन्ही पक्षाचे उमेदवार येथे उभे झाले होते. पण भाजपाच्या आशिष देशमुखांनी विजय मिळविला होता. आता राज्यात सेना-भाजपाची युती झाली आहे. पण युतीत ही जागा शिवसेनेला जाते आहे. मात्र भाजपा २०१४ मध्ये निवडून आल्यामुळे भाजपाच्या इच्छुकांनी येथे दावा केला आहे. लोकसभेपूर्वी ही पोटनिवडणूक होत असल्याने शिवसेनेला मदत करावीच लागेल, असे त्यांना वाटते आहे. त्यामुळे २०१४ ला शिवसेनेला मिळालेली १४ हजार मतांवरही भाजपाच्या इच्छुकांचा डोळा आहे. हीच अपेक्षा शिवसेनेच्या इच्छुकांकडूनही व्यक्त होत आहे. शिवाय युतीत काटोलची जागा शिवसेनेला जात असल्याने शिवसेनेतूनही इच्छुकांची दावेदारी वाढली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहे.
आघाडीत मात्र काटोलमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कायम राहणार आहे. पण साडेतीन महिन्यासाठी होणारा खर्च आणि परत ऑक्टोबरमध्ये लागणाऱ्या निवडणुकीत करावा लागणार खर्च, हे गणित राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी अवघड ठरते आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्याशिवाय पर्यायच नसल्याचे सांगण्यात येत आहे.