काटोल जिल्हा हवाच
By admin | Published: August 26, 2015 03:14 AM2015-08-26T03:14:09+5:302015-08-26T03:14:09+5:30
काटोल परिसरातील सात तालुक्यांसाठी जिल्हा मुख्यालय हे लांब अंतरावर आहे.
नागपूर : काटोल परिसरातील सात तालुक्यांसाठी जिल्हा मुख्यालय हे लांब अंतरावर आहे. त्यांच्यासाठी काटोल हे मध्यवर्ती ठिकाण असून त्यातूनच काटोल जिल्हा व्हावा, ही मागणी पुढे आली. यासाठी आतापर्यंत कृती समितीच्यावतीने वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन केले, तसेच निवेदन देण्यात आले. या कृती समितीसोबतच या भागाचे आ. डॉ. आशिष देशमुख यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना मंगळवारी मुंबईत देण्यात आले.
‘जिल्हा निर्मितीवरून काटोलमधील वातावरण तापले’ शीर्षकांतर्गत मंगळवारी वृत्त प्रकाशित होताच त्याची दखल घेत आ. आशिष देशमुख यांनी हे निवेदन सोपविले. मध्यंतरी २२ नव्या जिल्ह्यांचा शासनदरबारी प्रस्ताव असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. मात्र त्यात काटोलचे नाव नव्हते. त्यामुळे काटोल येथील नागरिकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी चालविली. तेथील वातावरणसुद्धा तापले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी असा एकाही जिल्ह्याचा प्रस्ताव नसल्याचे सांगितल्याने काहीअंशी काटोल भागातील नागरिक आणि कृती समिती शांत झाली. मात्र यापुढे आंदोलन करण्यात येईल, हे त्यांनी स्पष्ट केले. परिणामी तेव्हापासूनच जिल्हा निर्मितीवरून काटोलमध्ये धुसफूस सुरूच आहे. काटोल जिल्हा होणे हे कसे फायदेशीर आहे, याबाबत मंगळवारी ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे प्रकाश टाकला. त्यात वेगवेगळ्या बाबी पुढे करीत काटोल जिल्ह्याची आवश्यकता असल्याचे पटवून देण्यात आले. त्याची दखल घेत आ. डॉ. आशिष देशमुख यांच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन मुख्य सचिवांना निवेदन सोपविले. यावेळी आ. देशमुख यांच्यासोबत दिनकर राऊत आणि दिलीप हिवरकर उपस्थित होते.
(जिल्हा प्रतिनिधी)