काटोल, नरखेडला कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:08 AM2021-02-27T04:08:38+5:302021-02-27T04:08:38+5:30
काटोल/नरखेड/हिंगणा/कळमेश्वर/रामटेक/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. काटोल आणि नरखेड तालुक्याला कोरोनाने विळखा घातला आहे, ...
काटोल/नरखेड/हिंगणा/कळमेश्वर/रामटेक/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमणाचा वेग अधिक आहे. काटोल आणि नरखेड तालुक्याला कोरोनाने विळखा घातला आहे, तर हिंगणा आणि कळमेश्वर तालुक्यातील वाढत्या संक्रमणामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. इतके असतानाही कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांना सर्वत्र हरताळ फासला जात असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसून येत आहे.
काटोल तालुक्यात शुक्रवारी २८ रुग्णांची नोंद झाली. यात न.प. क्षेत्रातील १७, तर ग्रामीण भागातील ११ रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरामध्ये पाॅवर हाऊस येथे चार रुग्ण, रेल्वे स्टेशन, गळपुरा, सरस्वती नगर, नबिरा ले-आउट येथील प्रत्येकी दोन रुग्ण, तसेच देशमुखपुरा, जयसिंग ले-आउट, रामदेवबाबा ले-आउट, हत्तीखाना, शारदा चौक येथील प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये कोंढाळी येथे तीन रुग्ण, मसली, खंडाळा (खुर्द ) येथे प्रत्येकी दोन रुग्ण, तर कलंभा, नांदोरा, पारडसिंगा, कचारी सावंगा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात शुक्रवारी आणखी २२ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४, तर ग्रामीण भागातील १८ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १०९, तर शहरात ७१ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात शुक्रवारी जलालखेडा येथे ७, मोवाड (८), मेंढला (२), तर सावरगाव येथे एका रुग्णाची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात १७ रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राम्हणी न.प. क्षेत्रात ११, तर ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे. शहरात वाॅर्ड नंबर ३ मध्ये ३, रेल्वे स्टेशन परिसर (३), सावता मंदिर परिसर (२), देशमुख ले-आऊट (१), तर ब्राम्हणी येथे एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात परसोडी, पानउबाळी, सुसंद्री, चाकडोह, मोहपा आणि पारडी देशमुख येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगणा तालुक्यात शुक्रवारी ९१२ नागरिकांची चाचणी करण्यात आली. तीत २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात वानाडोंगरी, डिगडोह, टाकळघाट, हिंगणा येथे प्रत्येकी ४, इसासनी, शिरुळ येथे प्रत्येकी २, तर रायपूर येथे एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ४१८४ झाली आहे. यातील ४००३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
रामटेक ग्रामीणमध्ये संक्रमण अधिक
रामटेक तालुक्यात ग्रामीण भागात संक्रमणाचा वेग अधिक आहे. तालुक्यात शुक्रवारी ७ रुग्णांची नोंद झाली. यातील पाच रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११०४ झाली आहे. यातील ९८१ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी रामटेक शहरातील गांधी वाॅर्ड व रामलेश्वर वाॅर्ड येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीणमध्ये शिवनी, शीतलवाडी येथे प्रत्येकी दोन, तर वंडबा येथे एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.
कुहीला दिलासा
कुही तालुक्यात शुक्रवारी दिलासा मिळाला. तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर १५१ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.