काटोल-रामटेक जागेवरूनभाजप-शिवसेनेत रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 03:12 AM2019-09-12T03:12:50+5:302019-09-12T03:13:05+5:30
शिवसेनेने काटोल व रामटेक विधानसभेच्या जागेची मागणी केली आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत.
नागपूर : जिल्ह्यातील काटोल आणि रामटेक या दोन जागांवरून भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यापैकी एकही जागा सेनेला सोणार नाही, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.
शिवसेनेने काटोल व रामटेक विधानसभेच्या जागेची मागणी केली आहे. त्यावर बावनकुळे म्हणाले, दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. अशावेळी या दोन्ही जागा कशा काय सोडता येतील? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सिटींग सीट (मागच्या निवडणुकीत विजयी) सोडल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवसेनेला जागा मागण्याचा अधिकार आहे. परंतु या जागा भाजपच्याच आहेत. बावनकुळे यांनी व्यक्त केलेल्या या जाहीर भूमिकेमुळे आता जिल्ह्यात केवळ सावनेर हा एकच विधानसभा मतदार संघ उरला आहे, जिथे युतीत ही जागा शिवसेनेच्या खात्यात जाऊ शकते. मागच्या निवडणुकीत येथून भाजप उमेदवाराचे नामांकन रद्द झाले होते आणि काँग्रेस जिंकली होती.
एकमेव जागा उरली
शिवसेनेने काटोल व रामटेक या दोन मतदारसंघासह नागपूर शहरातील दक्षिण नागपूर व पूर्व नागपूर या दोन जागांवर दावा केला आहे. मात्र, या भाजपची भूमिका बघता या जागा सोडणेही कठीण दिसते.
नागपूर जिल्ह्यात सावनेर वगळता शिवसेनेला एकही मतदारसंघ उरलेला नाही. म्हणून जागा वाटपाकडे शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे.