काटोलचा कौल कुणाला, सत्तेच्या राजकारणाला की विकासाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:33+5:302021-08-29T04:11:33+5:30
सौरभ ढोरे काटोल : डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिकेच्या वॉर्ड रचनेचे आदेश राज्य निवडणूक ...
सौरभ ढोरे
काटोल : डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपालिकेच्या वॉर्ड रचनेचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या आदेशानंतर काटोल शहरातही राजकीय पारा वर चढतोय. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख यांचे होम टाऊन असलेल्या काटोल नगरपरिषदेत यावेळी कुणाची सत्ता येणार याकडे राजकीय पोलपंडितांचे लक्ष लागले आहे.
काटोल न.प.चा आजवरचा इतिहास पाहता येथे राजकीय पक्षापेक्षा गटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व राहिले आहे. मात्र सध्याची बदललेली राजकीय स्थिती पाहता यावेळी न.प.साठी शेकाप, राष्ट्रवादी अशी आघाडी होईल का, याला काँग्रेसची साथ मिळेल का? या चर्चांना काटोल शहरातील राजकीय कट्ट्यावर उधाण आले आहे.
गतवेळी चरणसिंग ठाकूर यांनी ‘विदर्भ माझा’च्या बॅनरवर काटोलचे मैदान मारले होते. २०२९ ची विधानसभेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढल्याने त्यांचा गट यावेळी भाजपच्या झेंड्याखाली निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. मात्र यावेळी दोन्ही गट नको असे सांगत काटोलमध्ये तिसरा पर्याय देता येईल का, यासाठी एका गटाची तयारी सुरू आहे.
काटोल नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रीय पक्षापेक्षा स्थानिक आघाडी करून चरणसिंग ठाकूर गट व राहुल देशमुख गटाने आजवरच्या निवडणुका लढविल्या आहेत. गेल्या निवडणुकीत ठाकूर गटाने ‘विदर्भ माझा’च्या बॅनरवर निवडणूक लढवित १८ नगरसेवक व नगराध्यक्षा निवडून आणत मैदान मारले होते. त्यापूर्वीच्या निवडणुकीत देशमुख गटाने नगराध्यक्षपद मिळविले होते. शेवटच्या काळात देशमुख गटातील काही सदस्य अपात्र ठरल्याने दहा महिन्यांकरिता ठाकूर गटाच्या अध्यक्षांनी कारभार पहिला. मात्र २०१७ मध्ये ठाकूर गटाने एकहाती सत्ता मिळवित काटोल न.प. चे मैदान मारले होते. इकडे राज्यात सत्ता आल्यानंतर आणि काटोल मतदारसंघात जि. प. आणि पं. स.च्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी न.प.निवडणुकीत काय भूमिका वठविते हेही महत्त्वाचे ठरणार आहे. यासोबतच भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसवासी झालेले आशिष देशमुख हेही वर्षभरापासून काटोलच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे न.प.निवडणुकीत ते समर्थकांना मैदानात उतरवतील का, हेही पाहणे महत्त्वाचे राहतील.
काटोल नगर परिषदेची एकूण सदस्य संख्या २३ आहे. यात विदर्भ माझाचा १८, शेकापचे ४ तर भाजपचा एका जागेवर विजय झाला होता. गतवेळी प्रभाग पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. एका प्रभागात दोन सदस्य होते. आता वॉर्डनिहाय निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांची न.प.च्या आखाड्यासाठी भाऊगर्दी होणार आहे, हे निश्चित.
280821\img_20181113_145059.jpg
काटोल नगर परिषद फोटो