हेटीसुर्ला साखर कारखान्याचे संचालक कात्रीत
By admin | Published: March 4, 2016 02:56 AM2016-03-04T02:56:23+5:302016-03-04T02:56:23+5:30
सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याचे संचालक मंडळ कारखाना बंद होऊन विक्री झाल्याच्या नऊ वर्षानंतर अडचणीत आले आहेत.
मुंबई जिल्हा बँकेने बजावली नोटीस :
कर्जाची परतफेड करण्याची ताकीद
कमलेश वानखेडे नागपूर
सावनेर तालुक्यातील हेटीसुर्ला येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याचे संचालक मंडळ कारखाना बंद होऊन विक्री झाल्याच्या नऊ वर्षानंतर अडचणीत आले आहेत. मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री रणजित देशमुख यांच्यासह संचालक मंडळातील १८ संचालकांना वसुलीची नोटीस बजावली आहे. प्रसंगी संपती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बहुतांश संचालक हे सामान्य शेतकरी असून त्यावेळचे देशमुखांचे खंदे समर्थक आहेत. आता वसुलीच्या नोटिसीमुळे या संचालकांची झोप उडाली आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी हेटीसुर्ला येथे साखर कारखाना सुरू केला होता. त्यावेळी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कारखान्यासाठी १५ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. बदल्यात कारखाना राज्य सहकारी बँकेकडे तारण ठेवण्यात आला होता.
सध्या कर्ज व व्याज मिळून सुमारे ६०.७७ कोटी रुपये कारखान्याकडे थकीत आहेत. संबंधित कर्जाची परतफेड करण्यात कारखाना अपयशी ठरला. त्यामुळे राज्य बँकेने सेक्युरिटायझेशन अॅक्ट २००२ नुसार कारवाई करीत २२ डिसेंबर २००६ रोजी काखान्याची मालमत्ता जप्त केली. पुढे ४ मे २००७ रोजी राज्य बँकेने कारखाना ‘जसा आहे तसा’ या अटीवर मे. प्रसाद शुगर्स अॅण्ड अलाईड अॅग्रो प्रॉडक्ट प्रा. लि., राहुरी, जिल्हा अहमदनगर यांना १२.९५ कोटी रुपयांमध्ये विकला.