कविता हा श्रीधर शनवारेंचा श्वास होता

By admin | Published: October 6, 2016 02:59 AM2016-10-06T02:59:40+5:302016-10-06T02:59:40+5:30

आपल्या कवितेने साठोत्तरी मराठी काव्यप्रवाहाला अधिक समृद्ध करणारे श्रीधर शनवारे हे दैववादी असले तरी त्यांचा कर्मावर विश्वास होता.

Kavita was the breath of Shridhar Shanwaren | कविता हा श्रीधर शनवारेंचा श्वास होता

कविता हा श्रीधर शनवारेंचा श्वास होता

Next

अक्षयकुमार काळे : प्रज्ञा दया पवार यांना श्रीधर शनवारे स्मृती काव्य पुरस्कार प्रदान
नागपूर : आपल्या कवितेने साठोत्तरी मराठी काव्यप्रवाहाला अधिक समृद्ध करणारे श्रीधर शनवारे हे दैववादी असले तरी त्यांचा कर्मावर विश्वास होता. त्यांनी आपले अख्खे आयुष्य कवितेला दिले. कविता हाच त्यांचा श्वास होता, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांनी केले. बुधवारी आकांक्षा प्रकाशन व शनवारे कुटुंबीयांतर्फे श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित पहिल्या श्रीधर शनवारे स्मृती काव्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. प्रज्ञा दया पवार यांच्या दृश्यांचा ढोबळ समुद्र या काव्यसंग्रहाला या पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. वि. स. जोग व त्यांच्यासोबत मंचावर अरुणा सबाने, डॉ. कविता शनवारे, डॉ. सृजला शनवारे-देसाई उपस्थित होत्या. श्रीधर शनवारे यांच्या साहित्य प्रवासाबाबत बोलताना डॉ. वि. स. जोग म्हणाले, आजकाल सामान्य माणसांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळत असताना श्रीधर शनवारे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान मोठे असूनही ते कायम अशा मोठ्या पुरस्कारापासून वंचित राहिले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना प्रज्ञा दया पवार म्हणाल्या, दलित पॅन्थरची चळवळ अगदी जोमात असताना माझा जन्म झाला. वडील दया पवार व नामदेव ढसाळ अशा शब्दातून अंगार ओकणाऱ्यांच्या प्रभावात वाढले. म्हणूनच माझी कविताही विद्रोहाच्या वाटेनेच पुढे गेली. या पुरस्काराने तिच्या विचारांचा गौरव झाला, ही निश्चितच माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी श्रीधर शनवारे यांच्या नावाने अशा पुरस्काराची सुरुवात केल्याबद्दल आकांक्षा प्रकाशन व शनवारे कुटुंबीयांचे अभिनंदन केले. ही मुळात एक काव्यस्पर्धा होती व या स्पर्धेसाठी राज्यभरातून एकूण ८० प्रवेशिका आल्या होत्या. प्रज्ञा आपटे, डॉ. अनिल नितनवरे व डॉ. प्रमोद मुनघाटे हे या स्पर्धेचे परीक्षक होते. अखेर हा पुरस्कार प्रज्ञा दया पवार यांच्या दृश्यांचा ढोबळ समुद्र या काव्यसंग्रहाला देण्याचा निर्णय एकमताने झाला, अशी माहिती अरुणा सबाने यांनी प्रास्ताविकातून दिली. या कार्यक्रमाचे संहिता वाचन डॉ. सृजला शनवारे-देसाई यांनी तर संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Kavita was the breath of Shridhar Shanwaren

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.