केदार समर्थकांचा पत्ता कट, वासनिकांवर रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:11 AM2021-08-28T04:11:38+5:302021-08-28T04:11:38+5:30
नागपूर : प्रदेश काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत क्रीडा मंत्री सुनील केदार समर्थकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. केदार यांनी ...
नागपूर : प्रदेश काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत क्रीडा मंत्री सुनील केदार समर्थकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. केदार यांनी शिफारस केलेल्या एकालाही यादीत स्थान देण्यात आलेले नाही. उलट केदारांविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करणारे माजी आमदार आशिष देशमुख यांची वर्णी लागली. यामुळे केदार समर्थक कमालीचे दुखावले आहेत. माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांच्या हस्तक्षेपामुळेच गेम झाला, असा केदार समर्थकांचा उघड आरोप आहे.
प्रदेश काँग्रेसच्या यादीत समर्थकांना स्थान मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे फिल्डिंग लागली होती. नेत्यांनी तशी यादी पटोलेंकडे सादर केली होती. प्राप्त माहितीनुसार केदार यांच्याकडून ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, कामठी विधानसभेत लढलेले जि.प. चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, युवक काँग्रेसच्या रामटेक लोकसभेच्या माजी अध्यक्ष कुंदा राऊत, नागपूर विभागाचे बूथ संघटक प्रकाश वसु यांच्यासह आणखी काही नावे देण्यात आली होती. प्रदेश काँग्रेसच्या सूत्रानुसार केदारांनी दिलेली बहुतांश नावे प्रदेश काँग्रेसकडून दिल्लीत पाठविण्यात आली. मात्र, दिल्लीत अंतिम शिक्कामोर्तब करताना ही नावे वगळण्यात आली. या सर्व घटनाक्रमामागे वासनिक यांचा हात असल्याचा केदार समर्थकांचा आरोप आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखविण्यात आली आहे. केदार यांनी मात्र स्वत: या मुद्यावर मौन साधले आहे.
कोटेचा, पठाण यांना वगळल्याने आश्चर्य
- जुन्या कार्यकारिणीत प्रदेश सचिव राहिलेले अतुल कोटेचा व मुजीब पठाण यांना वगळण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षाच्या विविध कार्यक्रमांमध्ये या दोन्ही युवा नेत्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. मात्र, त्यानंतरही त्यांना संधी मिळाली नाही.
पुरवणी यादी येणार
- प्रदेश काँग्रेसच्या यादीत अनेक महत्वाच्या नेत्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे धुसफूस वाढली आहे. महापालिका, नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका तोंडावर आहेत. या नाराजीचा फटका पक्षाला बसू नये म्हणून लवकरच निवडक नेत्यांची एक पुरवणी यादी जाहीर केली जाण्याची शक्यता प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.