हिंगण्यात केदार विरुद्ध मेघे लढतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 08:44 PM2024-06-08T20:44:09+5:302024-06-08T20:58:49+5:30

- आभार सभेत केदारांनी व्यक्त केली इच्छा : सावनेरमध्ये कोण?

Kedar Vs Meghe fight signal in Hingane | हिंगण्यात केदार विरुद्ध मेघे लढतीचे संकेत

हिंगण्यात केदार विरुद्ध मेघे लढतीचे संकेत

कमलेश वानखेडे, नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सुरू झालेली माजी मंत्री सुनील केदार व आ. समीर मेेघे यांच्यातील टसल लोकसभा निवडणुकीनंतरही थांबलेली नाही. लोकसभा निवडणुकीत हिंगणा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाल्यानंतर आता केदार यांनी या मतदारसंघातून लढण्याचे संकेत दिले आहे. केदार यांच्या निकटवर्तीयांच्या मते यावेळी ते हिंगण्यातूनच लढतील व मेघे यांना आव्हान देतील.

लोकसभेच्या निकालानंतर ६ जून रोजी हिंगणा येथे काँग्रेसचे आभार सभा झाली. या सभेत माजी आ. विजय घोडमारे यांनी आता हा मतदारसंघ सजला असल्याचे सांगत येथे बाहेरून उमेदवार देऊ नका, अशी विनंती केली. यावर बोलताना केदार यांनी मी स्वत: येथून लढलो तर चालेल का, अशी जाहीरपणे विचारणा करीत या मतदारसंघात लढण्याचे संकेत दिले. मला या विधानसभा क्षेत्रात आमदार निवडून आणायचा आहे. ये मेरा ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही त्यांनी दिला होता. विशेष म्हणजे यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या जि.प. उपाध्यक्ष कुंदा राऊत, उज्वला बोढारे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्यांनी उभे राहून या घोषणेचे स्वागत केले. सुरुवातीला केदारांचे हे संकेत मेघे यांना धडकी भरविण्यासाठी असावेत, असा अंदाज बाधल्या गेला. मात्र, केदार यांच्या निकटवर्तीयांनी ते हिंगणा मतदारसंघातूनच लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केदार खरच हिंगण्यातून लढले तर सावनेरमध्ये कोण, याचीही समर्थकांना उत्सुकता असेल.
 

असे आहे हिंगण्याचे राजकीय चित्र
- २०१९ मध्ये हिंगणा मतदारसंघातून भाजपचे आ. समीर मेघे ४६ हजार १६७ मतांनी विजयी झाले होते.
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेला २५ हजार ९१९ मतांची आघाडी होती.
- २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने येथे बाजी पलटवत १७ हजार ८६२ मतांची आघाडी घेतली.

हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात
- महाविकास आघाडीत हिंगणा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. माजी मंत्री रमेश बंग यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. माजी आ. विजय घोडमारे यांना राष्ट्रवादीकडून येथे पराभवाला सामोरे जावे लागले. २०१४ मध्ये आघाडीत बिघाडी झाली असताना कुंदा राऊत येथून काँग्रेसकडून लढल्या होत्या. सध्या येथे राष्ट्रवादीकडून घोडमारे यांच्यासह जि.प. सदस्य दिनेश बंग, उज्वला बोढारे इच्छुक आहेत. केदारांनी संकेत दिल्यानंतर हा मतदारसंघ काँग्रेससाठी सुटतो का, याकडे लक्ष लागले आहे.

अपात्रतेच्या निकालाकडे लक्ष
- जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांना शिक्षा झाल्याने ते अपात्र झाले असून त्यांची आमदारकी रद्द झाली. दोष सिद्धीला स्थिगिती मिळावी म्हणून केदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या दोषसिद्धीला स्थगिती मिळाली तर त्यांची अपात्रता रद्द होऊ शकते व ते आगामी विधानसभेची निवडणूक लढू शकतील. त्यामुळे या निकालाकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागले आहे.
 

Web Title: Kedar Vs Meghe fight signal in Hingane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.