केदारांचा मेडिकलमध्ये मुक्काम वाढणार!
By सुमेध वाघमार | Published: December 23, 2023 06:54 PM2023-12-23T18:54:34+5:302023-12-23T18:55:01+5:30
मेडिकलच्या वॉर्ड क्र. ५२ या अतिदक्षता विभागात (आयसीयू) आ. केदार यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागपूर : जिल्हा बँक रोखे घोटाळा प्रकरणी न्यायालयाने आ. सुनील केदार यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी रात्री वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये आणले असता त्यांच्या ईसीजीमध्ये बदल आढळून आला. यामुळे त्यांना ‘आयसीयूम’ध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी पुन्हा काही तपासण्या करण्यात आल्या. शिवाय, ‘हार्ट रेट’ कमी असल्याने, मायग्रेन व घशाचा संसंर्ग असल्याने केदारांचा मेडिकलमध्ये मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.
मेडिकलच्या वॉर्ड क्र. ५२ या अतिदक्षता विभागात (आयसीयू) आ. केदार यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राप्त माहितीनुसार, आ. केदार यांचा शनिवारी पुन्हा ईसीजी काढण्यात आला. यात त्यांचे पुन्हा ‘हार्ट रेट’ कमी असल्याचे दिसून आले. त्यांना घशात इन्फेक्शन असून मायग्रेनचाही त्रास होत आहे. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना आॅक्सीजन दिले जात आहे. शिवाय, विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. ‘एमआरआय’ करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. हृद्य विकारावरील सल्लासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृद्य विकार तज्ज्ञाचा सल्लाही घेण्यात येणार आहे. यामुळे आ. केदार यांना आणखी काही दिवस मेडिकलमध्ये काढावे लागण्याची शक्यता आहे.