सणासुदीच्या काळात भेसळखोरांवर ठेवणार करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 05:53 PM2021-09-13T17:53:33+5:302021-09-13T17:55:11+5:30
Nagpur News दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी नागपुरात दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दूध, तेल, मिठाई व अन्य खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणारे जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. या भेसळखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे दिले. सोमवारी अन्न व औषध विभागाच्या नागपूर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. (Keep a close eye on food and sweets during the festive season)
भेसळसंदर्भात नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत अशा असामाजिक तत्त्वांवर अंकुश लावा. लगेच कारवाई करा. भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली या सहाही जिल्ह्यांमध्ये हॉटेल व्यावसायिक व अन्नपदार्थ निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांच्या बैठका घ्या. भेसळीशिवाय उत्तम दर्जाचे अन्न पदार्थ, त्यावर निर्मिती आणि एक्स्पायरीसंदर्भातील तारखा छापल्या गेल्या अथवा नाही याची खातरजमा करा, येत्या काही दिवसांत आकस्मिक भेटी वाढवा. तपासण्या वाढवा, असेही स्पष्ट केले.
राज्यात प्रतिबंधित वस्तू आयात-निर्यात होण्याची शक्यता आहे, यावर लक्ष ठेवा. तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीच्या तपासण्या वाढवा, औषध प्रशासन विभागाने नियमित मेडिकल स्टोअर्सची तपासणी करावी, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देण्यास मेडिकल स्टोअर्सला मज्जाव करावा, अशा पद्धतीची औषधी सहज उपलब्ध होत असेल तर मेडिकलवर कारवाई करावी, असेही सांगितले. बैठकीला नागपूर विभागाचे सहआयुक्त ए. आर. वाने, चंद्रपूरचे सहायक आयुक्त नितीन मोहिते, भंडारा, गडचिरोलीचे ए.पी. देशपांडे, औषधे विभागाचे नागपूर येथील सहायक आयुक्त पी. एम. बल्लाळ, चंद्रपूरचे उ.ग. बागमारे उपस्थित होते.
ऑक्सिजन व औषधांची उपलब्धता
नागपूर विभागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती हे लक्षात घेऊन ऑक्सिजनचा साठा व त्याचा सुलभ, सहज नियमित पुरवठा याकडे लक्ष ठेवा. राज्य शासनाने यासंदर्भात साठवणुकीचे सूत्र ठरविले असून त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात साठा व्हावा. बेकायदा रेमडिसिविर इंजेक्शन विक्री व साठा विरुद्ध धडक कारवाईसह औषधांचा तुटवडा नागपूर विभागात जाणवणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले.