ठेवा आता तुमच्या खिशात संविधानाची प्रत; नागपूरकर तरुणांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:23 AM2019-10-05T11:23:14+5:302019-10-05T11:23:51+5:30

लोकांना आपले भवितव्य घडवण्याची शक्ती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे संविधान घराघरात पोहचविण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरू आहे. ‘हर घर संविधान, हर जेब संविधान’ हा त्यांचा नारा आहे.

Keep a copy of the constitution in your pocket now; Nagpurkar Youth Activities | ठेवा आता तुमच्या खिशात संविधानाची प्रत; नागपूरकर तरुणांचा उपक्रम

ठेवा आता तुमच्या खिशात संविधानाची प्रत; नागपूरकर तरुणांचा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे‘हर घर संविधान, हर जेब संविधान

सुमेध वाघमारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय संविधानाच्या मूल्यदृष्टीबद्दल लोक जागरूक असतील तर भारतीय संविधानाची वाटचाल खऱ्या अर्थाने समतावादी, मुक्तिदायी समाजाकडे होऊ शकते. याच उद्देशाने नागपुरातील काही तरुण एकत्र आले. समाजाला मानवी प्रतिष्ठेकडे नेणारा हा दस्तावेज कपाटात नव्हे तर नेहमी खिशात असावा, यावर एकमत झाले. स्वत:च्या खिशातील पैसे खर्च करीत भारतीय संविधानाची ‘पॉकेट साईज’ प्रती काढल्या. हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेत असलेल्या या संविधानाच्या आतापर्यंत दीड लाख प्रति नागरिकांच्या हाती दिल्या. लोकांना आपले भवितव्य घडवण्याची शक्ती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे संविधान घराघरात पोहचविण्यासाठी त्यांची धडपड आजही सुरू आहे. ‘हर घर संविधान, हर जेब संविधान’ हा त्यांचा नारा आहे.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर ९ ऑगस्ट २०१८ रोजी भारतीय संविधान जाळण्याची घटना घडली. स्तब्ध करणाºया या घटनेचे पडसाद भारतभर उमटले. समता सैनिक दल, मुख्यालय दीक्षाभूमीचे अ‍ॅड. आकाश मून, अ‍ॅड स्मिता कांबळे, डॉ. महेंद्र कांबळे, विश्वास पाटील, सुनील जवादे, राजेश लांजेवार, आनंद तेलंग आदी युवक मंडळीही अस्वस्थ झालीत. समता सैनिक दलामार्फत नागपूरच्या संविधान चौकात त्यांनी धरणे आंदोलन केले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी संविधान जाळण्याच्या विरोधात रॅलीही काढली. परंतु पुढे काय, या प्रश्नाने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक समतोल टिकविण्यासाठी संविधान किती महत्त्वाचे, त्याची व्यापकता सामान्यांसह तळागळातील लोकांनी कळावी हा विचार समोर आला. यातूनच प्रत्येकाच्या हातात संविधानाची प्रत देण्याची, संविधानाबद्दल जनमानसाता आस्था व नवचेतना निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अ‍ॅड. मून म्हणाले, बाजारात भारतीय संविधान मोठ्या किमतीत, मोठे आकाराचे व सोबत बाळगण्यासारखे नाही. त्यामुळे लहान आकाराचे, हिंदी, इंग्रजी व मराठी भाषेतील, कमी खर्चातील, परंतु उच्च प्रतीचे, जसेच्या तसे संविधान निर्माण करण्याच्या कार्याला सुरुवात झाली. सुरुवातीला प्रत्येकाने स्वत:च्या खिशातून याचा खर्च भागवला. कोरियन पेपरवर सव्वाचार बाय सव्वा सात इंच आकाराच्या तीन भाषेतील संविधानाच्या प्रती तयार झाल्या. याचे वैशिष्ट्य असे की त्यात केवळ ‘बेअर अ‍ॅक्टच’ नाही तर एक सामाजिक ग्रंथ म्हणून संविधानाचा नावलौकिक व्हावा यासाठीही प्रयत्न करण्यात आले. त्यात संविधान निर्मितीचा इतिहास अन्य वैशिष्ट्ये व इतर महत्त्वपूर्ण माहिती अंतर्भूत करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे संविधान सभेला जो भारताच्या संविधानाचा मसुदा सादर केला गेला होता तो सुद्धा या आवृत्तीत समाविष्ट करण्यात आला. या आवृत्तीचे प्रकाशक राजेश लांजेवार, आनंद तेलंग तर संपादक अ‍ॅड स्मिता कांबळे आहेत. संविधानाच्या वितरणाची सुरुवात नागपूरच्या दीक्षाभूमीवरून केली. एका वर्षात मुंबई, दिल्ली, राजस्थान येथे जाऊन सव्वा लाख प्रती वाटल्या. ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने दीक्षाभूमीवर या संविधानाच्या आवृत्तीचे वितरण केले जाणार आहे. ही मोहीम आता देशभर राबविली जाणार आहे.

Web Title: Keep a copy of the constitution in your pocket now; Nagpurkar Youth Activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.