निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
By योगेश पांडे | Published: September 24, 2024 07:47 PM2024-09-24T19:47:41+5:302024-09-24T19:48:54+5:30
Amit Shah : नागपुरात विदर्भातील ६२ विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीदरम्यान ते बोलत होते.
नागपूर : 'पार्टी विथ अ डिफरन्स' अशी प्रतिमा असलेल्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागपुरात येऊन पक्षातील गटबाजीवरून पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. राजकारणात काम करत असताना अनेकदा मतभेद होत असतात. तर विविध कारणांमुळे अनेकांना उमेदवारी मिळत नाही. त्यातून गटबाजी निर्माण होते. मात्र निवडणूक काळात पक्षात अशी गटबाजी खपवून घेणार नाही. सर्वांनी अंतर्गत मतभेद बाजुला सारून एकत्रित निवडणूकीचे काम केले पाहिजे, असे प्रतिपादन अमित शाह यांनी केले. विशेष म्हणजे उपस्थित हजारो पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी ही बाब वदवून घेतली. नागपुरात विदर्भातील ६२ विधानसभांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता बैठकीदरम्यान ते बोलत होते.
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिव प्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, रणधीर सावरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
एका तिकीटासाठी अनेक दावेदार असतात. मात्र सर्वेक्षण, जातीय समीकरणे इत्यादी बाबी पाहून उमेदवारी निश्चित करावी लागते. जर तिकीट मिळाले नाही तर त्यावरून कुणीही असंतुष्ट होऊन त्यावर गोंधळ घालत आहे असे प्रकार विदर्भात दिसायला नको, असे परखड मत अमित शाह यांनी व्यक्त केले. सर्वांनी कटुता दूर सारून महायुतीसाठी मैदानात उतरले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा धनुष्यबाण व अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चिन्ह असलेल्या घड्याळीच्या उमेदवारांचा कमळाप्रमाणेच पूर्ण ताकदीने प्रचार झाला पाहिजे, असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.
विदर्भात महायुतीला ४५ जागा हव्यात
भाजपचे महाराष्ट्रातील नेते विदर्भात महायुतीला ४० ते ४२ जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र जर महाराष्ट्रात सत्ता हवी असेल तर विदर्भात कमीत कमी ४५ जागांवर विजय आवश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीने नियोजन करायला हवे, असे निर्देश अमित अमित शाह यांनी दिले.
महाविकास आघाडीला बुथपातळीवर कमकुवत करा
यावेळी अमित शहा यांनी भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने बुथपातळीवर जाऊन काम करण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे बुथपातळीवरील कार्यकर्ते भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा. विरोधकांना बुथपातळीवर कमकुवत करण्यावर भर द्या, असे अमित शाह यावेळी म्हणाले.
वक्फ संशोधन बिल पुढील अधिवेशनात पास होणार
देशभरात वक्फ संशोधन बिलावरून विविध चर्चांना उधाण आले आहे. याबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी महत्त्वाची माहिती दिली. हे बिल संसदेच्या पुढील अधिवेशनात मंजूर होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.