कारखाने सुरू ठेवा, कामगारांना क्वारंटाईन करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 08:49 PM2020-07-14T20:49:55+5:302020-07-14T20:53:31+5:30
एखाद्या कारखान्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना तब्बल २८ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्याने कारखाना तब्बल एक महिना बंद राहतो. कारखाने सुरू ठेवा आणि संपर्कातील कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन करू नका, अशा आशयाचे निवेदन हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सी.जी. शेगावकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या कारखान्यात कोरोना रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कामगारांना तब्बल २८ दिवस क्वारंटाईन करण्यात येते. त्यामुळे कामगार कामावर येत नसल्याने कारखाना तब्बल एक महिना बंद राहतो. कारखाने सुरू ठेवा आणि संपर्कातील कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन करू नका, अशा आशयाचे निवेदन हिंगणा एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सी.जी. शेगावकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले आहे.
शेगावकर म्हणाले, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कामगारांचा अहवाल नकारात्मक आढळल्यानंतरही आरोग्य विभाग कामगारांना १४ दिवस संस्थात्मक आणि १४ दिवस होम असे एकूण २८ दिवस क्वारंटाईन ठेवण्याचे आदेश देतात. ही बाब हिंगणा एमआयडीसीतील दोन कारखान्यांमध्ये घडली आहे. दोन्ही कारखान्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर ते एक महिन्यासाठी बंद ठेवावे लागले. एका कारखान्यात ८ जूनला कोरोना रुग्ण आढळला होता. कारखाना हॉटस्पॉट घोषित केल्यानंतर आरोग्य विभागााचे अधिकारी कुणाचेही ऐकत नाही. कोरोना रुग्णाची माहिती जिल्हा, तहसील आणि आरोग्य विभागाला दिली होती. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी असोसिएशनच्या कार्यालयाला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी कोरोना रुग्णाच्या स्थितीत कारखाना पूर्णपणे सॅनिटाईज्ड करून दोन ते तीन दिवस सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. पण दुर्दैवाने असे होत नाही. कामगारांचे अहवाल नकारात्मक आल्यानंतरही त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के लावण्यात येत असल्याने खुद्द कामगारच कामावर येत नाही. त्यामुळे उत्पादन थांबते.
चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले, कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना कामावर ठेवता येईल. कामगारांना २८ दिवस क्वारंटाईन करणे चुकीचे आहे. संबंधित आरोग्य विभागांना योग्य सूचना दिल्यानंतर असे होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एक किंवा दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास आणि उर्वरित नकारात्मक असतील तर तीन दिवसात उत्पादन पुन्हा सुरू करता येईल. निगेटिव्ह आढळलेल्या कामगारांची संख्या कमी केली जाणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील माहिती सर्व उद्योजकांना द्यावी, असे ठाकरे म्हणाले.
स्थलांतरित कामगार पुन्हा कामावर येत आहे. त्यांची आरोग्य तपासणी करूनच कामावर ठेवण्यात येत आहे. संबंधित विभागाने कामगारांना घाबरवू नये, उत्पादन सुरू ठेवण्यास मदत करावी, असे शेगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. चर्चेदरम्यान जिल्हा परिषदेचे सीईओ योगेश कुंभेजकर, उद्योग संचालनालयाचे सहसंचालक अशोक धर्माधिकारी आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.