अत्यावश्यक सेवा वगळून शासकीय कार्यालये बंद ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:07 AM2021-04-25T04:07:23+5:302021-04-25T04:07:23+5:30
नागपूर : जिल्ह्यात वाढत्या पॉझिटिव्हची संख्या आणि मृत्यूचे आकडे एकप्रकारे दहशत निर्माण करीत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द ...
नागपूर : जिल्ह्यात वाढत्या पॉझिटिव्हची संख्या आणि मृत्यूचे आकडे एकप्रकारे दहशत निर्माण करीत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ मोहीम राज्य सरकारने हाती घेतली असून, अनेक निर्बंध लादले आहेत. पण, शासकीय कार्यालयात अजूनही वर्दळ कमी झाली नाही. अनेक कार्यालयांत १०० टक्के कर्मचारी उपस्थित राहत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात येत आहेत.
शासकीय कार्यालय सुरू असल्यामुळे नागरिक आपले काम करण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा मारत आहेत. पर्यायाने संपर्क होऊन कोरोनाचा प्रसार होत आहे. नागपूर जिल्ह्यात ३५ हजारांच्या जवळपास शासकीय कर्मचारी आहेत. कर्मचारी संघटनांनी घेतलेल्या आढाव्यानुसार किमान १५ टक्के कर्मचारी आज पॉझिटिव्ह आहे. ६० च्या जवळपास शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ३५० ते ४०० कर्मचारी आहेत. यातील १०० च्या जवळपास कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. चार लोकांचा मृत्यू झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कोषागार कार्यालयाचे अर्धे कर्मचारी पॉझिटिव्ह आहे. तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रशासकीय इमारत क्रमांक २ मध्ये १५ टक्के कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहे. अशीच परिस्थिती बहुतांश सरकारी कार्यालयाची आहे. कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांचे कुटुंबही पॉझिटिव्ह निघत आहे.
- जिल्ह्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजासाठी लोक येत असल्याने, त्यांच्यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांची संख्या पाच टक्के ठेवणे आवश्यक आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. कार्यालये दररोज सॅनिटाईज व्हायला पाहिजे.
- नाना समर्थ, कार्याध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना
- सद्यस्थितीत शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणणे गरजेचे आहे. याबरोबरच शक्य असेल तेथे घरूनच ऑनलाईन काम करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- ज्ञानेश्वर महल्ले, जिल्हाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवती संघटना नागपूर
- कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत काम करणे अवघड जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून शासकीय कार्यालये १०० टक्के बंद करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
डॉ. सोहन चवरे, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना