पक्षाच्या विचारांचा झेंडा घेऊन पुढे चालत रहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:14 AM2020-02-24T11:14:24+5:302020-02-24T11:14:45+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील विनम्रतेचा परिचय रविवारी सुमतीताई सुकळीकर यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात आला. पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या निर्मला चितळे यांचे गडकरींनी पाया पडून आशीर्वाद घेतले अन् तेव्हा अख्खे सभागृह भारावून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्ता ही क्षणभंगूर आहे. आज मिळणारा मान उद्या मिळणार नाही. त्यामुळे सत्तेचा मोह सोडून पक्षाच्या विचारांचा झेंडा घेऊन पुढे चालत रहा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.
भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरतर्फे सुमतीताई सुकळीकर स्मृतिदिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन रविवारी विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नितीन गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती मीरा खडक्कार होत्या. त्याचबरोबर माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृ ष्णा खोपडे, मोहन मते, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, उपमहापौर मनिषा कोठे, माजी महापौर अर्चना डेहनकर उपस्थित होते. यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या सुधा सोहनी यांचा सत्कार करण्यात आला. सुमतीतार्इंच्या कार्याबद्दल गडकरी म्हणाले, तार्इंचे जीवनकार्य मोठे आहे. जनसंघाच्या काळापासून सुमतीताई कार्य करीत होत्या. तेव्हा पक्षाला लोकसमर्थन नव्हते. विचारांना प्रतिष्ठा नव्हती, ब्राह्मणांची पार्टी म्हणून हिणवले जात होते. जातीयवादी, सांप्रदायिक, गांधीचा खून करणारे म्हणून अपमानित केले जात होते. तो काळ अतिशय प्रतिकूल होता. अशावेळी सुमतीताई सुकळीकर यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम केले. अपमान सहन करीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन पक्षाचा विचार समाजात रुजविला. भाजपाला आज जे यश मिळत आहे, ते तार्इंसारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी हा इतिहास महत्त्वाचा आहे. आपण भूतकाळ विसरलो तर उद्याचे उज्वल भविष्य लिहू शकणार नाही. सत्ता, यश यामागे न धावता भारतीय जनता पक्षाच्या विचारांना तळागळात पोहचविण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. तार्इंच्या कामाचे मूल्यमापनच होऊ शकत नसल्याचे खडक्कार म्हणाल्या.
भीती निर्माण करून व्होटबँकेचे राजकारण होत आहे
सीएएच्या नावावर देशभरात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. मुस्लीम समाजाला भीती दाखवून व्होटबँक मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे पक्षाचा, संघटनेचा विचार तळागळापर्यंत पोहचविण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले.
-वृत्त/८