जनतेसोबत नाळ जोडून ठेवा : भाजप आमदारांना संघाचे बौद्धिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:38 AM2019-12-19T00:38:14+5:302019-12-19T00:40:25+5:30
हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आलेल्या भाजपच्या आमदारांनी बुधवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागस्थित स्मृतिमंदिर परिसरास भेट दिली. विशेषत: यात नव्यानेच पक्षात आलेल्यांचादेखील समावेश होता. राज्यातील सत्ता गेल्यानंतर प्रथमच आमदार संघस्थानी येत असल्याने संघातर्फे काय मार्गदर्शन करण्यात येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु या सर्वांना संघाच्या कार्यपद्धतीची ओळख करून देण्यावरच भर राहिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघातर्फे जास्त ‘बौद्धिक’ टाळण्यात आले असले तरी जनतेसोबत नाळ जोडून ठेवा, असे सांगत हवा तो संदेश देण्यात आला आहे.
सकाळच्या सुमारास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात सर्व आमदार रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरात पोहोचले. यात ‘इनकमिंग’ केलेले राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, नीतेश राणे यांचादेखील समावेश होता, शिवाय प्रदेश संघटनमंत्री व्ही. सतीश हेदेखील उपस्थित होते. सर्व मंत्री व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर मार्गदर्शन वर्गाला सुरुवात झाली.
संघातर्फे विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया, महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे हे उपस्थित होते. संघ विचारधारा, कार्यप्रणाली, चालणारे उपक्रम यांची माहिती देण्यात आली. जिल्हाजिल्ह्यात आमदारांनी जनतेसोबत समन्वय जास्तीत जास्त कसा वाढेल यादृष्टीने कार्य केले पाहिजे, असा सल्ला यावेळी देण्यात आला. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्या डोळ्यासमोर ठेवूनच काम करावे, असेदेखील श्रीधर गाडगे यांनी सांगितले.
राणेंचा ‘दक्ष’ पवित्रा
एरवी नीतेश राणे प्रसारमाध्यमांना सहजपणे प्रतिक्रिया देतात. मात्र संघभूमीत त्यांनी ‘दक्ष’ पवित्रा घेतला. येथे बोलणे योग्य होणार नाही व ती येथील परंपरा नाही, असे म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
केवळ संघाची ओळख करून देण्यासाठी वर्ग
राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारणा केली असता, हा वर्ग केवळ नवनिर्वाचित भाजपा आमदारांना संघाची ओळख करून देण्यासाठी होता, असे त्यांनी स्पष्ट केले. संघाच्या या वर्गाची उत्सुकता होती, असेदेखील ते म्हणाले. संघ विचारसरणीशी मी आधी परिचित होतो. स्मृतिमंदिर परिसरात प्रत्यक्ष संघस्थानी आल्यावर समाधान वाटतंय, महान नेत्यांच्या आठवणी इथे आहेत, अशी भावना आ. गणेश नाईक यांनी व्यक्त केली.