रेल्वेस्थानक, रेल्वेगाड्या स्वच्छ ठेवा : सोमेश कुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 10:01 PM2020-09-16T22:01:44+5:302020-09-16T22:02:53+5:30
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात बुधवारी स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी रेल्वेस्थानकाच्या परिसरात सफाई करून प्रवाशांना रेल्वेस्थानकाचा परिसर, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या नेतृत्वात बुधवारी स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यांनी रेल्वेस्थानकाच्या परिसरात सफाई करून प्रवाशांना रेल्वेस्थानकाचा परिसर, रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती केली.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या प्रांगणात रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वच्छता जागरूकता दिनाची शपथ दिली. महात्मा गांधी यांचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांनी वर्षातून १०० तास म्हणजे आठवड्यातून २ तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकाच्या परिसरातील ऑटो पार्किंगच्या परिसरात श्रमदान करून सफाई केली. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रवासादरम्यान रेल्वेस्थानक, रेल्वे परिसर, रेल्वे प्रतीक्षालय तसेच रेल्वेच्या कोचमध्ये कचरा न पसरविण्याचे आवाहन त्यांनी प्रवाशांना केले. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुप कुमार सतपथी, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज तिवारी यांनीही श्रमदान केले. या प्रसंगी सर्व शाखा अधिकारी, रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन स्वच्छता अभियानात आपले योगदान दिले. पंधरवड्यात नागपूरसह विभागातील सर्व रेल्वेस्थानकांवर स्वच्छता जागरूकता अभियान राबविण्यात आले.
दपूम रेल्वेतही स्वच्छता जागरूकता दिन साजरा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातही स्वच्छता जागरूकता दिन विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला. विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या परिसरात त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यानंतर बेलिशॉप रेल्वे कॉलनी, शिवमंदिर, मोतिबाग कॉलनी, अजनी मैदानापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. विभागातील सर्व रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांनी रेल्वेस्थानक, परिसर आणि रेल्वेगाड्यात स्वच्छता राखण्याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक शोभना बंदोपाध्याय यांनी जागरूकता केली.