बाजारपेठा स्वयंपूर्ण बंद ठेवणे हाच कोरोना संसर्ग नियंत्रणावर ठोस उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 08:47 PM2020-09-10T20:47:20+5:302020-09-10T20:50:41+5:30
आता कोरोनाची भीती व्यापाऱ्यांनाही सतावत असून संसर्ग होऊ नये म्हणून काही बाजारपेठा ठराविक कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय काही व्यापारी संघटनांनी घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आता कोरोनाची भीती व्यापाऱ्यांनाही सतावत असून संसर्ग होऊ नये म्हणून काही बाजारपेठा ठराविक कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय काही व्यापारी संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे ग्राहक आणि व्यापारी यांचा थेट संपर्क येणार नसल्याने कोरोना संसर्ग वाढण्यावर काही प्रमाणात प्रतिबंध येईल. नागपुरात सर्वच बाजारपेठांमध्ये काही दिवस लॉकडाऊन करण्यासाठी नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्सने पुढाकार घ्यावा, असे मत काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
बाजारपेठा काही दिवसांसाठी स्वयंपूर्ण बंद करण्यासाठी गांधीबाग होलसेल क्लॉथ मार्केटसह काही व्यापारी संघटनांनी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सला पत्र लिहिले आहे. या संदर्भात चेंबर मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असून त्यावर अंमलबजावणी झाल्यास नागपुरात वाढत्या संसर्गावर निश्चितच आळा बसेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गांधीबाग होलसेल क्लॉथ अॅण्ड यार्न मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान म्हणाले, मार्केटमध्ये जवळपास पाच हजार कर्मचारी काम करतात. दुकाने बंद केली तर कर्मचारी घरी बसणार नाहीत. ते बाजारात फेरफटका मारतील. त्यामुळे संसर्ग जास्त वाढण्याची शक्यता आहे. याकरिता सर्व बाजारपेठांच्या संघटनांनी स्वयंपूर्ण बाजार बंद केले तर कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल. मार्केटमध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांनाही मास्क घालण्यास आणि सॅनिटायझर वापरण्यास बंधनकारक केले आहे. त्यामुळे संसर्गावर काही प्रमाणात आळा येत आहे. सर्वच बाजारपेठा एकाचवेळी बंद झाल्यास आम्हीही त्यात सहभागी होऊ, असे मदान म्हणाले.
इतवारी होलसेल किराणा असोसिएशनचे सचिव शिवप्रताप सिंह म्हणाले, इतवारी आणि मस्कासाथ येथील किराणा बाजारात दररोज किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांची गर्दी होते. पण त्यावर प्रतिबंध घालणे कठीण आहे. ही बाब संसर्ग वाढण्यास कारणीभूत असून बाजारपेठा बंद करून त्यावर आवर घालणेही शक्य नाही. दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा झाल्यास लोकांची ओरड होईल. मुख्य म्हणजे नागपुरातील सर्वच बाजारपेठा काही दिवसांसाठी बंद केल्यास कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यास निश्चितच मदत होईल.
कोरोनाची साखळी तुटण्यासाठी कळमन्यात होलसेल न्यू ग्रेन मार्केट आणि फ्रूट मार्केट असोसिएशनने आठवड्यातून चार दिवस मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. याच धर्तीवर नागपुरातील सर्वच बाजारपेठा आठवड्यातून काही दिवस स्वयंपूर्ण बंद असाव्यात, असे मत ग्रेन मार्केटचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले.