नागपुरात केजरीवालांना मिळाले प्रशासकीय ‘संस्कार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 10:33 AM2020-02-12T10:33:49+5:302020-02-12T10:35:47+5:30
शांत व विवेकी स्वभाव, तसेच ‘साधी राहणी’ असलेल्या केजरीवाल यांनी १९ वर्षांपूर्वी नागपुरातील ‘एनएडीटी’ येथे प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण घेतले होते.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकात अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’ने परत एकदा दणदणीत विजय मिळवून ‘टीमस्पिरिट’चा आदर्शच जगासमोर ठेवला आहे. केजरीवाल यांच्या या यशाचे सर्वात मोठे श्रेय त्यांची प्रशासकीय हातोटी, मागील पाच वर्षांत विविध विकासात्मक कामांसाठी घेतलेला पुढाकार व योजनांच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या पुढाकाराला जात आहे. केजरीवालांमधील हे गुण घडविण्यात नागपूरचा मोठा वाटा राहिलेला आहे. शांत व विवेकी स्वभाव, तसेच ‘साधी राहणी’ असलेल्या केजरीवाल यांनी १९ वर्षांपूर्वी नागपुरातील ‘एनएडीटी’ येथे प्रशासकीय सेवेचे प्रशिक्षण घेतले होते. येथे मिळालेल्या प्रशासकीय संस्कारांवर चालत ते ‘आयकॉन’ झाले, हे विशेष.
केजरीवाल हे राजकारणी असले तरी त्यांचा मूळ पिंड हा प्रशासकीय अधिकाऱ्याचा आहे. त्यांच्यातील व्यक्तिमत्त्व घडविण्यात नागपूरचा मौलिक वाटा राहिला. भारतीय महसूल सेवा परीक्षा उत्तीर्ण केल्यावर केजरीवाल १९९४-९५ या दरम्यान प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणासाठी नागपुरातील छिंदवाडा मार्गावरील प्रत्यक्ष कर अकादमी येथे आले होते. यावेळी त्यांचा मुक्काम अकादमीतीलच ‘नालंदा’ वसतिगृहाच्या खोली क्र. १६ मध्ये होता. या खोलीमध्ये केजरीवाल यांनी देशाची अर्थव्यवस्था, करव्यवस्था अन् समाजाशी जुळलेल्या विविध मुद्यांबाबत सखोल अभ्यास केला. एखादी गोष्ट करायची म्हणजे ती करायचीच, ही त्यांची जिद्द असायची. एखादा मुद्दा सखोल जाणून घ्यायचा असेल तर ते तहानभूक हरवून वाचत बसत. तब्बल दीड वर्षे येथे राहून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. ते ४७ व्या बॅचचे प्रशिक्षणार्थी होते. याच कालावधीत देशातील राजकारणाची स्थिती, समाजकारणाची दिशा यावरदेखील त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा होत व त्यातून त्यांचे विचार घडत गेले.
समाजकारणाचे रोवले गेले बीज
केजरीवाल यांच्या साध्या राहणीचे नागरिकांमध्ये आकर्षण आहे. त्यांच्यातील समाजसेवकाच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवातदेखील नागपुरातच झाली. प्रशिक्षणार्थी सहकाºयांचे जुने वापरलेले कपडे ते गोळा करायचे. अनेकांना याचे आश्चर्य वाटायचे. हे कपडे ते काटोल मार्गावरील मदर टेरेसा आश्रमाला द्यायचे. शिवाय अकादमीमध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.
नागपुरातच भेटल्या ‘मिसेस मुख्यमंत्री’
केजरीवाल यांच्या प्रशासकीय अधिकारी तसेच राजकारणी म्हणून प्रवासात त्यांच्या पत्नी सुनिता या नेहमीच त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. केजरीवाल राजकारणात गेल्यानंतर त्यांनी ‘आयआरएस’ सेवेतून स्वेच्छानिवृत्तीदेखील घेतली. सुनिता नावाची ही सावली केजरीवाल यांना नागपुरातच गवसली. प्रशिक्षण काळात ‘एनएडीटी’मध्ये प्रशिक्षणार्थी असलेल्या सुनिता यांच्याशी अरविंद केजरीवाल यांची मैत्री जुळली. दोघांचेही विचार जुळत होते. प्रशिक्षण सुरू असताना मनांची आपसूकच गुंफण झाली. केजरीवाल यांनी सुनिता यांना साधेपणाने ‘प्रपोज’ केले व त्यांना लगेच होकारदेखील मिळाला. नंतर त्या सौ. सुनिता केजरीवाल झाल्या. विशेष म्हणजे मी गोविंदाचा ‘फॅन’ होतो व आम्ही दोघांनी नागपुरातील अनेक चित्रपट पाहिले, असे खुद्द केजरीवाल यांनीच सांगितले होते. अशाप्रकारे केजरीवाल यांचे नागपूरशी एक आगळेवेगळे नाते आहे.
केजरीवाल १९९४-९५ मध्ये येथील प्रशिक्षण पूर्ण करून परत गेले. मात्र त्यांच्या मनात अकादमीविषयी निर्माण झालेले प्रेम त्यांना गत १० वर्षांपूर्वी पुन्हा येथे खेचून आणले. अरविंद केजरीवाल अकादमीमधील नवीन प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरात आले होते. यावेळी अकादमीमधील वैशाली गेस्ट हाऊसमध्ये काही दिवस मुक्काम केला होता.