कर्ज चुकविण्यासाठी केली चेन स्नॅचिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:09 AM2021-01-03T04:09:06+5:302021-01-03T04:09:06+5:30
नागपूर : ५० हजारांचे कर्ज चुकविण्यासाठी चेन स्नॅचिंग करणाऱ्या युवकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री ...
नागपूर : ५० हजारांचे कर्ज चुकविण्यासाठी चेन स्नॅचिंग करणाऱ्या युवकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री गिट्टीखदानमधील फ्रेंड्स कॉलनीत घडली.
जितेंद्र बाबूलाल हाडगे (वय २६, रा. सुरेंद्रगड) असे आरोपीचे नाव आहे. फ्रेंड्स कॉलनी येथील रहिवासी रितिका निनावे सायंकाळी ७.३० वाजता परिसरातील बेकरीतून सामान खरेदी करून दुचाकीने घरी परत जात होत्या. अनुपम सोसायटीत नाल्याच्या जवळ संधी पाहून बाईकस्वार जितेंद्र रितिकाच्या जवळ आला. त्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातून २२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर तो बाईकने फरार झाला. काही अंतरावर त्याची बाईक स्लिप झाली. दरम्यान, रितिकाची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक गोळा झाले. त्यांनी जितेंद्रला पकडले. याची सूचना मिळताच गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जितेंद्रला अटक केली. जितेंद्र गरीब कुटुंबातील आहे. तो एका दूध विक्रेत्याकडे काम करतो. घरोघरी जाऊन दूध विकतो. या कामात त्याला अल्प उत्पन्न मिळते. त्याने कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने आर्थिक टंचाईमुळे ५० हजाराचे कर्ज घेतले होते. हे कर्ज तो फेडू शकत नव्हता. कर्ज देणारे पैशासाठी तगादा लावत होते. जितेंद्रला पैसे परत करण्यासाठी कोणताही मार्ग सुचत नव्हता. त्यामुळे त्याने चेन स्नॅचिंग करण्याचा बेत आखला. पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. १५ दिवसांत आर्थिक टंचाईमुळे लूटमारीत युवक पकडल्या गेल्याची ही दुसरी घटना आहे.
..........