नशा डोक्यात भिनल्याने केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:20+5:302021-04-24T04:08:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नशा करताना ओव्हरडोज झाल्याने काही वेळेपूर्वी एकमेकांसोबत लाडीगोडीने वागणारे दोन गुन्हेगार हिंसक झाले अन् ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नशा करताना ओव्हरडोज झाल्याने काही वेळेपूर्वी एकमेकांसोबत लाडीगोडीने वागणारे दोन गुन्हेगार हिंसक झाले अन् त्यातील एका आरोपीने दुसऱ्याची दगडाने ठेचून हत्या केली. आरोपी रोहित मून याला अटक करून पोलिसांनी त्याचा पाच दिवसांचा पीसीआर मिळविला आहे. शुभम उर्फ कचरा राजेश मासुरकर (वय २७) असे मृताचे नाव असून, तो मायानगर झोपडपट्टीत राहत होता. मून आणि मासुरकर दोघेही गुन्हेगारी वृत्तीचे होते. त्यांना अमली पदार्थाचे व्यसन होते. मासुरकर कचरा वेचायचा, तर मून छोट्या-मोठ्या चोऱ्या करायचा. बऱ्याचदा ते एकत्र बसून व्यसन करीत होते. गुरुवारी सायंकाळी जरीपटक्यातील आर्यनगरात एका खाली प्लॉटवर ते व्यसन करीत होते. नशा डोक्यात भिनल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर, आरोपी मून याने कचरा मासुरकरला दगडाने ठेचून ठार मारले आणि पळून गेला. माहिती कळताच, जरीपटक्याच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचल्या. त्यांनी आरोपी मूनला ताब्यात घेतले. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पाच दिवसांचा पीसीआर मंजूर केला. मासुरकरला दीड महिन्यांपूर्वी साडेचार हजार रुपये उधार दिले होते. ते परत करण्यास नकार दिल्याने वाद झाल्यामुळे त्याची हत्या केल्याचे आरोपी मून पोलिसांना सांगतो आहे.
----