केंद्रीय विद्यालय ते लष्करप्रमुख...मनोज पांडेंचा शिस्तबद्ध ‘मनोदय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 08:30 AM2022-04-19T08:30:00+5:302022-04-19T08:30:02+5:30
Nagpur News नागपुरातील केंद्रीय विद्यालयातून शालेय शिक्षण घेतलेल्या मनोज पांडे यांनी लहानपणापासून लष्करात जाण्याचा संकल्प केला व आपल्या शिस्तबद्ध कर्तबगारीतून तो ‘मनोदय’ पूर्णदेखील केला.
योगेश पांडे
नागपूर : अंबाझरी मार्गाकडून अमरावती मार्गावरील ‘मनोदय’...पहायला गेले तर एक साधे सुटसुटीत घर...मात्र या घरातील व्यक्तींनी दिलेल्या संस्कारांमुळे या कुटुंबातून देशाला कणखर मानसिकतेचे लष्करप्रमुख मिळाले. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे १ मे पासून देशाचे लष्करप्रमुख म्हणून ओळखले जातील व लष्कर प्रमुखांचे शहर ही नागपूरची नवी ओळख बनणार आहे. नागपुरातील केंद्रीय विद्यालयातून शालेय शिक्षण घेतलेल्या मनोज पांडे यांनी लहानपणापासून लष्करात जाण्याचा संकल्प केला व आपल्या शिस्तबद्ध कर्तबगारीतून तो ‘मनोदय’ पूर्णदेखील केला.
नागपूर विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख व ज्येष्ठ मानसतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पांडे हे मनोज पांडे यांचे वडील. १९६४ ते १९९७ या कालावधीत ते नागपूर विद्यापीठात कार्यरत होते व मानसशास्त्रावरील दांडग्या अभ्यासातून त्यांनी ‘मानसिक व्यवस्थापन’ तसेच ‘मानसिक स्वास्थ्य व तंत्र’ यासारखी प्रसिद्ध पुस्तके लिहिली. मनोज पांडे वायुसेना नगरातील केंद्रीय विद्यालयातून शालेय धडे घेत असताना दृढ व कणखर मानसिकतेचे देखील त्यांच्यावर घरातूनच संस्कार होत होते. यामुळेच सैन्यात ३९ वर्षे सेवा दिल्यानंतर देखील अतिशय शांत व जमिनीशी जुळलेले अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. मनोज पांडे यांच्या मातोश्री प्रेमा पांडे या आकाशवाणीत उद्घोषिका होत्या. दैनंदिन आयुष्यातील सुसूत्रता, प्रत्येक गोष्टीचे टिपण काढणे इत्यादी गुण विकसित करण्यात त्यांचा मौलिक वाटा होता.
विसाव्या वर्षी सैन्याच्या सेवेत
शाळेत असतानाच पांडे यांनी सैन्यात जाण्याचे निश्चित केले होते व तशी तयारीदेखील केली होती. ‘एनडीए’ची परीक्षा देऊन ते पुण्यात दाखल झाले. तर १९८२ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच ते पुण्याच्या कोर ऑफ इंजिनिअर्स (बॉम्बे सॅपर्स) या लष्कराच्या अभियांत्रिकी सेवेत रुजू झाले. व्यस्ततेमुळे त्यांचे नागपुरातील निवासस्थानी नियमित येणे होत नाही. मात्र नागपुरातील सर्व ‘अपडेट्स’ ते नियमितपणे घेत असतात अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.
लहान बंधू, मुलगा, सूनदेखील देशसेवेत
पांडे कुटुंबाने देशसेवेची परंपराच जपली असून मनोज पांडे यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे लहान बंधू संकेत पांडे यांनीदेखील लष्कराचा मार्ग पकडला व ते लष्करात कर्नल होते. सर्वात लहान भाऊ डॉ. केतन पांडे हे ब्रुनोईच्या राजाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी होते. मनोज पांडे यांचा मुलगा अक्षय व सून दोघेही फायटर पायलट आहेत.