काेराडीचा बंधारा पुन्हा फुटला, आठ ट्रक बुडाले
By निशांत वानखेडे | Published: February 6, 2024 05:30 PM2024-02-06T17:30:49+5:302024-02-06T17:32:25+5:30
बंधारा फुटताच पाण्याच्या लाेंढ्यात येथे राखेची उचल करण्यासाठी उभे असलेले आठ ट्रक पूर्णपणे बुडाले.
नागपूर/कोराडी/खापरखेडा : काेराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख साठवणूक हाेणाऱ्या बंधाऱ्याच्या आतमधील बंधारा मंगळवारी फुटला. हा बंधारा फुटताच पाण्याच्या लाेंढ्यात येथे राखेची उचल करण्यासाठी उभे असलेले आठ ट्रक पूर्णपणे बुडाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही.
मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास काेराडी वीज केंद्राची राख साठवणूक हाेणाऱ्या सुरादेवी राख बंधाऱ्याच्या आतील भागात पाणी अडविण्यासाठी असलेला बंधारा अचानक फुटला. मिळालेल्या माहितीनुसार बंधाऱ्यातील राखेची माेफत उचल करण्याचे काम खाजगी व्यक्तीला दिले आहे. या ठिकाणची राख उचलून नेण्यासाठी पाण्याची अडचण होऊ नये म्हणून पाणी अडवण्यासाठी राखेचा बंधारा घातला आहे. राखेची उचल करताना चुकीच्या ठिकाणी खोलगट भाग तयार झाल्याने पाणी अडवून ठेवणारा हा बांध फुटल्याचे व पाणी बंधाराच्या आतच राखेची उचल सुरू असलेल्या भागात शिरल्याची माहिती आहे. पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की काही वेळातच हे ट्रक पाण्यात बुडाले. ट्रक चालकांनी प्रसंगावधान साधून तिथून पळ काढला. या घटनेने राखेची उचल करणारे ट्रक चे नुकसान वगळता इतर कोणतेही नुकसान झालेले नाही.
नागपूरचे अशोक डागा, असद मलिक, खापरखेडाचे निकेतन पौनिकर, निखिल भुरकुंडे, मंगेश जांगड़े बिना संगम व चनकापूरचे लीलाधर राउत यांचे ट्रक बुडाल्याची माहिती आहे. दोन एकर जागेत बारा ते पंधरा फूट उंच पर्यंत पाणी जमा झाले, ज्यामुळे पाण्याखाली बुडालेले ट्रक दिसेनासे झाले.
आश्चर्य म्हणजे केन्द्राच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती पाच तास उशिरा कळली. त्यानंतर मोटार लावून बंधाऱ्यातून राखेचे पाणी काढण्याचे काम सुरू करण्यात आले. सायंकाळी चार वाजेनंतर बुडालेले चार ट्रक दिसून आले. जमा झालेले पाणी काढल्यावर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्यात येईल, मात्र त्यालाही दोन दिवस पेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. विजकेंद्राच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्या कडे विशेष लक्ष दिले असते तर बंधाऱ्याची जाडी कमी झाली नसती आणि ही घटना घडली नसती, असे बाेलले जात आहे. दरम्यान काेराडी पाेलिसांनी घटनास्थळी पाेहचून घटनेचा पंचनामा केला.