केरळच्या दांपत्याची नागपुरात आत्महत्या, मुलीलाही विष पाजले
By योगेश पांडे | Published: July 5, 2024 06:42 PM2024-07-05T18:42:35+5:302024-07-05T18:42:58+5:30
Nagpur : पत्नीच्या आजारपणामुळे उचलले टोकाचे पाऊल
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन महिन्यांअगोदर केरळहून नागपुरला आलेल्या एका दांपत्याने विष प्राशन करत आत्महत्या केली. तर ११ वर्षीय मुलीलादेखील विष पाजत जीव घेण्याचा प्रयत्न केला. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही ह्रद्यद्रावक घटना घडली आहे. या दांपत्यापैकी पत्नीच्या आजारपणामुळे हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
रिजू विजयन उर्फ विजय नायर ( ४०) आणि प्रिया रिजू नायर (वय ३४) अशी मृतक दांपत्याची नावे आहेत. तर त्यांची मुलगी वैष्णवी (११) ही मृत्यूशी झुंज देत आहे. नायर कुटुंबीय नारा मार्गावरील गजानन आरकेएस पब्लिक स्कूलजवळील प्रकाश वाडी यांच्या घरी किरायाने राहत होते. तीन महिन्यांअगोदरच ते नागपुरात आले होते. त्यांनी गुरुवारी मोनोकीम नावाचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी नायर दाम्पत्य व मुलगी वैष्णवी हिच्यासोबत बैशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी नायर दाम्पत्याला तपासून मृत घोषित केले. वैष्णवीवर उपचार सुरू आहेत.
रिजू व त्यांचे कुटुंब मूळ केरळ येथील आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यांची पत्नी प्रिया हिला रक्ताचा कर्करोग असल्याने तिच्या उपचारासाठी ते नागपुरात आले होते. लहान मुलगी वैष्णवीसुद्धा त्यांच्यासोबत आली. प्रियावर शहरातील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात त्यांचा उपचार सुरू होता. रिजू केरळ येथे पेंटिंगची कामे करीत असे. तीन महिन्यांत उपचारावर त्यांचा बराच खर्च झाला. आर्थिक अडचण व आजारपण यामुळे ते तणावात होते. त्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वैष्णवीवर मेयो इस्पितळात उपचार सुरू असून तिच्या बयाणातून आत्महत्येचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.