चावी बनविणारी लुटारूंची टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:11 AM2021-08-20T04:11:11+5:302021-08-20T04:11:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - चावी बनविण्याच्या बहाण्याने घरात शिरून रोख आणि दागिने लंपास करणारी टोळी शहरात सक्रिय झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - चावी बनविण्याच्या बहाण्याने घरात शिरून रोख आणि दागिने लंपास करणारी टोळी शहरात सक्रिय झाली असून, या टोळीतील भामट्यांनी गेल्या सात दिवसात तीन ठिकाणाहून लाखोचा ऐवज चोरून नेला.
घरातील फ्रीज, कपाटाची चावी हरविली किंवा कुलूप नादुरुस्त झाले का, अशी विचारणा करीत दोन भामटे शहरातील विविध भागात फिरतात. बऱ्यापैकी घर दिसले की ते स्वत:हूनच त्या घरी पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने चाैकशी करतात. कपाटाची चावी जुजबी किमतीत चांगली करून देतो किंवा कपाटाचे दार जाम झाले असेल तर चांगले करून देतो, अशी थाप मारून ते कपाट गाठतात. घरच्या सदस्यांना गोष्टीत गुंतवून कपाटात ठेवलेली रोख तसेच सोन्याचे दागिने लंपास करतात. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास काटोल मार्गावर असलेल्या विघ्नहर्ता कॉलनीतील पल्लवी स्वप्निल चाैकीकर (वय ३५) यांच्या घरी दोन भामटे आले. यावेळी पल्लवी आणि तिची सासू घरात होती. फ्रीजची चावी बनवून देतो, असे सांगून त्यांनी घरातील कपाटाची चावी मागितली. सासू-सुनेचे लक्ष विचलित करून त्यांनी ती चावी वाकविली. त्यानंतर ती कपाटाला लावण्यास सांगितले. चावी वाकल्यामुळे कपाटाला लागत नव्हती. आरोपींनी ती संधी साधून कपाट गाठले अन् सासू-सुनेची नजर चुकवून कपाटात ठेवलेले सोन्याचे अडीच लाखाचे दागिने लंपास केले. ते भामटे निघून गेल्यानंतर कपाट तपासले असता ही चोरी लक्षात आली. पल्लवी यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदविली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, त्या भामट्यांचा शोध घेतला जात आहे.
--------
नंदनवन, कळमन्यातही घडल्या घटना
अशा घटना गेल्या सात दिवसात नंदनवन आणि कळमना परिसरातही घडल्या. तसे गुन्हेही त्या भागात दाखल झाले असून, सीसीटीव्हीच्या आधारे या भामट्यांचा पोलीस आता शोध घेत आहेत.
--------