अस्वस्थ खडसेंनी व्यक्त केली भाजपातील घुसमट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 11:00 AM2017-12-21T11:00:03+5:302017-12-21T11:00:28+5:30
माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज, आपल्याला काही प्रकरणांमध्ये जाणूनबुजून व्हिलन करण्यात आल्याची खंतही व्यक्त केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : मी ४० वर्षे भाजपात काम केले. आज मला सगळेच पक्ष त्यांच्याकडे बोलावतात; पण मी भाजपा सोडणार नाही, हे सांगतानाच माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज, आपल्याला काही प्रकरणांमध्ये जाणूनबुजून व्हिलन करण्यात आल्याची खंतही व्यक्त केली.
काही टीव्ही चॅनेल्सशी बोलताना खडसे यांनी पुण्यातील जमीन प्रकरणात आपण निर्दोष सिद्ध होऊ, असा विश्वास व्यक्त केला. आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवेशाची आॅफर आहे; पण जो पक्ष वाढविण्यासाठी आपण ४० वर्षे कष्ट केले, तो पक्ष आपण सोडणार नाही. आपल्यावर अन्याय होत असल्याची भाजपात आणि बाहेरही भावना आहे; पण पक्ष घेईल तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे ते म्हणाले.
शेतकरी कर्जमाफीची योजना प्रभावीपणे लोकांपर्यंत नेण्यात आपण अपयशी ठरत आहोत, असे मत आपण मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केले आहे. नारायण राणे यांना भाजपासोबत घेण्याच्या निर्णयाचे खडसे यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, यापूर्वी अनेक व्यक्ती भाजपात वा सोबत आल्या. पक्षविस्तारासाठी हे सगळे करावेच लागते.