खडसेंच्या चौकशीला या आठवड्यापासून सुरुवात
By admin | Published: July 27, 2016 02:52 AM2016-07-27T02:52:55+5:302016-07-27T02:52:55+5:30
राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाने भोसरी (जि. पुणे) येथील एमआयडीसीत केलेल्या भूखंड खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप लावण्यात आले होते.
रविभवनात होणार कामकाज : राजकीय भवितव्यावर होणार निर्णय
नागपूर : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबाने भोसरी (जि. पुणे) येथील एमआयडीसीत केलेल्या भूखंड खरेदीत गैरव्यवहार झाल्याचे आरोप लावण्यात आले होते. या खरेदी प्रकरणाची चौकशी नागपुरात होणार असून सेवानिवृत्त न्यायाधीश डी.एस.झोटिंग यांच्या अध्यक्षतेत चौकशीच्या कामाला या आठवड्यापासून सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. हा चौकशी अहवाल खडसे यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा राहणार आहे.
राज्य मंत्रिमंडळात काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावी मंत्री असलेल्या खडसे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’तील जमीन खरेदी व्यवहारात गैरप्रकार केल्याचा आरोप लावण्यात आला होता. यानंतर खडसे यांना पदाचा राजीनामादेखील द्यावा लागला. या जमीन व्यवहाराची न्यायालयीन चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डी. एस. झोटिंग करणार आहेत.
डी. एस. झोटिंग हे नागपूरचेच असल्यामुळे चौकशीचे कामकाज रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ येथूनच चालणार आहे. यासाठी सर्व प्रशासकीय तयारी सुरू असून आवश्यक त्या सर्व सुविधा येथे पुरविण्यात येणार आहेत. या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती का, ही जमीन एमआयडीसी कायदा वा महसूलविषयक विविध अधिनियमान्वये हस्तांतरणीय किंवा विक्रीपात्र होती का, याची चौकशी करण्यात येईल. तसेच खडसे यांनी मंत्रिपदाचा वापर या जमीन खरेदी व्यवहारात केला काय (कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट), याचीही चौकशी केली जाईल. (प्रतिनिधी)
खडसेंनादेखील बोलावण्याची शक्यता
संबंधित जमीन व्यवहाराबाबत झालेले आरोप-प्रत्यारोप, विद्यमान व तत्कालीन अधिकाऱ्यांसह सर्व संबंधितांची येथे सुनावणी होणार आहे. संबंधित जमीन मूळ मालकाकडेच होती आणि त्याच्याशी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता, असा दावा खडसे यांनी केला होता. त्यामुळे खडसे यांनादेखील चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.