नागपुरात ‘खजुरा’ची शेती
By admin | Published: June 10, 2017 02:38 AM2017-06-10T02:38:54+5:302017-06-10T02:38:54+5:30
जिल्ह्यात खजुराची शेती होत आहे, असे कुणी म्हटले, तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे.
भरघोस उत्पादन : शेतकऱ्याचा पाच एकरात यशस्वी प्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात खजुराची शेती होत आहे, असे कुणी म्हटले, तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. एका शेतकऱ्याने आपल्या पाच एकर शेतीत खजुराच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. एवढेच नव्हे, तर त्यातून भारघोस उत्पादनही घेत आहे. नागपुरातील उष्ण आणि कोरडे वातावरण खजुराच्या शेतीसाठी पोषक ठरत आहे. स्वरन तंगवेल असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याचे मोहगाव झिल्पी बांधाशेजारी शेत आहे. त्यांनी आपल्या शेतावर २००९ मध्ये खजुराच्या झाडांची लागवड केली. आता त्याला फळधारणा सुरू झाली आहे. त्यातून त्यांना दरवर्षी अनेक क्विंटल खजुराचे उत्पादन होत आहे.
स्वरन यांच्या मते, खजुराचे नाव घेताच अरब देशातील चित्र डोळ्यासमोर उभे राहते. काही वर्षांपूर्वी माझे वडील दक्षिण भारतात फिरायला गेले होते. तेथे त्यांना खजुराची शेती दिसली. त्यानंतर मी स्वत: खजुराच्या शेतीचे प्रशिक्षण घेतले आणि परत येताच खजुरांच्या १२० झाडांची शास्त्रोक्त पद्घतीने लागवड केली. या झाडांच्या लागवडीसाठी जमिनीत जैविक खाताची गरज असते. सुरुवातीची काही वर्षे झाडांची काळजी घ्यावी लागली. यानंतर चौथ्या वर्षापासून प्रत्येक झाडाला २५ ते ३० किलो फळधारणा सुरू झाली. आता त्याच झाडांपासून प्रत्येक वर्षी ९० किलोपर्यंत फळे मिळत आहेत. यामुळे झाडांची लागवड करण्यासाठी लागलेल्या खर्चाची पहिल्याच वर्षी वसुली झाली. प्रत्येक वर्षी १५ जूनपासून खजुराचे उत्पादन मिळायला सुरुवात होते. यानंतर एक ते दीड महिन्यात सर्व फळांची विक्री होते. अमरावती व मुंबई येथील व्यापारी शेतातूनच फळांची खरेदी करतात. स्वरन यांनी या खजुराच्या शेतीसाठी पदवी शिक्षण मध्येच बंद केले. ते म्हणाले, खजुराच्या लागवडीसाठी फार मोठा खर्च येतो. त्यामुळे खजुराच्या शेतीसाठी गुजरातमध्ये ५० टक्के आणि राजस्थानमध्ये ७५ टक्के अनुदान दिले जाते. स्वरन यांनी सध्या आपल्या शेतात खजुरासोबतच ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, नारळ व भाजीपाल्याची सुद्धा लागवड केली आहे.